मुंबईतील मालवणी मधील इमारत कोसळली : ६ चिमुरडे आणि एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मालाडमधील एका 3 मजली चाळीचा काही भाग कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 6 मुलांसह 9 जणांचा करुण अंत झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुंबईतील मालाड पूर्व या ठिकाणी मालवणी गेट क्र. 8 येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात ही दुर्घटना घडली. या ठिकाणी एका 3 मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या 1 मजली चाळीवर कोसळला. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. रात्रभर शोधकार्य सुरू होते. या चाळीत राहणाऱ्या राफिक यांच्या कुटुंबावर काळाने घाला घातला. राफिक यांच्यासह त्यांची पत्नी रईसा बानो आणि घरातील 6 चिमुरडे ढिगाराखाली सापडले. तर राफिक यांचा भाऊ आणि त्याची पत्नीसुद्धा ढिगाराखाली अडकले आणि त्यांचा मृत्यू झाला. राफिक यांच्या कुटुंबातील 6 चिमुरड्यांचा यात मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील एकूण 9 जणांचा या दुर्घटनेमध्ये करुण अंत झाला.
मृतांमध्ये  साहिल सर्फराज सय्यद वय 9 वर्ष, तर अरिफा शेख या 8 वर्षांच्या चिमुरड्यांचा मृत्यू झाला. तर 3 आणि 5 वर्षांच्या चिमुरडीचा सुद्धा यात समावेश आहे. एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 9 जण हे राफिक यांच्या कुटुंबातील होते.
या मृतांमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांचा समावेश आहे. तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई महापालिकाने मृतांसह गंभीर जखमींची यादी जाहीर केली आहे. या जखमींवर सध्या कांदिवलीतील शताब्दी आणि आजूबाजूच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच सध्या दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2021-06-10


Related Photos