विजय मल्ल्याच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तपास अधिकारी असल्याचे भासवून आठ जणांना ४५ ;लाखांचा गंडा


- महागडया एसयूव्ही गाडया स्वस्त दरात मिळवून देण्याचे दाखवले आमिष 
- पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
  फरार उद्योगपती विजय मल्ल्याच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तपास अधिकारी असल्याचे भासवून  जप्त केलेल्या महागडया एसयूव्ही गाडया स्वस्त दरात मिळवून देण्याचे आमिष दाखवून आठ जणांना ४५ लाख रुपयांना फसवणाऱ्या ४५ वर्षीय आरोपीचा सीबीडी आणि खारघर पोलिसांकडून कसून शोध सुरु आहे. 
आरोपीने विजय मल्ल्याच्या ताफ्यातील जप्त केलेल्या महागडया एसयूव्ही गाडया स्वस्त दरात मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्याच्या या आमिषाला भुलून तक्रारदारांनी त्यांच्या खात्यात ऑनलाइन रक्कम ट्रान्सफर केली.  खात्यात रक्कम जमा झाल्यानंतर आरोपी गायब झाला. आरोपीने आर.के.सिन्हा, राजीव कुमार सिंह अशी बनावट नावे धारण करुन आपण ईडी आणि कस्टम खात्यात अधिकारी असल्याचे दाखवले. खारघरमध्ये सात आणि सीबीडीमध्ये एका व्यक्तीला त्याने गंडा घातला. ईडी मल्ल्याकडून जप्त केलेल्या महागडया एसयूव्ही कारचा लिलाव करणार आहे असे सांगून त्याने सप्टेंबर महिन्यात सीबीडीमधल्या एका माणसाला ४.२५ लाख रुपयांना फसवले.
आरोपीने सीबीडी-बेलापूर येथे रहाणारे रहिवाशी सुरेंद्रनाथ सिंह (५९) यांच्याबरोबर मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने ओळख वाढवली. आपण दिल्लीहून आलो असल्याचे त्याने सांगितले. त्याने सिंह यांना काही एसयूव्ही गाडयांचे फोटो दाखवले. सिंह यांनी पजेरो गाडी निवडली. सिंह यांनी आरोपीच्या खात्यात ऑनलाइन रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर तो फरार झाला.  
जेव्हा पोलीस आरोपीच्या सीबीडी येथी निवासस्थानी पोहोचले तेव्हा त्याच्या कुटुंबियांनी घराचे दार उघडण्यास नकार दिला. सासू, बायको आणि दोन मुली पोलिसांना उत्तर देण्यासाठी पुढे आल्या. घरी येणाऱ्या नागरिकांना घाबरवण्यासाठी त्याने दोन कुत्रेही पाळले आहेत. आरोपीबद्दल काहीही माहिती नसल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले. आरोपी त्याच्या गावी बिहारला निघून गेल्याचा पोलिसांना संशय आहे.  Print


News - Rajy | Posted : 2018-10-31


Related Photos