श्रीनगर येथील महिलांनी गावातील दारू व मोहसडवा केला नष्ट


- अशक्य वाटणारी दारू बंदी केली शक्य
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी /  मुलचेरा :
संपूर्ण तालुक्यामध्ये दारूविक्रीसाठी ओळखल्या जाणाऱ्या आणि आसपासच्या अनेक गावांना दारूचा पुरवठा करणाऱ्या श्रीनगर गावात मुक्तिपथ गाव संघटनेच्या माध्यमातून ६ ड्रम दारू पकडण्यात आली व नदी काठावरील परिसरात लपवलेला मोहाचा सडवाही नष्ट करण्यात आला. श्रीनगरची दारू बंद होणे ही अनेकांना अशक्य वाटणारी गोष्ट संघटनेच्या चिवट चळवळीतून शक्य झाली आहे.
इथली दारू बंद करून दाखवाच! असे आवाहन द्यायला लावणारे गाव म्हणजे श्रीनगर. गावामध्ये जवळपास ५० दारू विक्रेते अवैध दारू विक्री करत होते. येथील गाव संघटनेच्या महिलांनी सर्व दारू विक्रेत्यांना नोटीस दिली व आपल्या जवळ असलेल्या दारूची विल्हेवाट लावण्यास सांगितले. त्यानंतर संघटनेतील महिलांनी गावामधील दारू विक्रेत्याच्या घरी धाड मारली व दारू बंदीचे रणशिंगच फुंकले, थोडी थोडकी नाही, तर ६ ड्रम इतक्या मोठ्या प्रमाणातली दारू महिलांना एकाच विक्रेत्याच्या घरी सापडली. त्यांनी ती दारू नष्ट केली व विक्रेत्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.

विक्रेत्याच्या घरची दारू पकडल्यानंतर दुसऱ्या दिवशी श्रीनगरच्या महिलांनी आपला मोर्चा गावातील नदी परिसरात वळवला. नदीच्या आसपास  दारूच्या भट्ट्या, अड्डे असलेल्या परिसरात दारू शोधण्यासाठी महिलांनी चढाईच केली. तेथे बरेच मोहाचे सडवे सापडले. तो सर्व मोहफुलांचा साठा या महिलांनी नष्ट केला. याचा परिणाम असा झाला आहे, की गावामध्ये होणाऱ्या अवैध दारू विक्रीचे प्रमाण बरेच कमी झाले असून, लपून छपून काही जण दारू विकत आहेत.
त्याआधी देवनगर, मोहुर्ली, उदयनगर व श्रीनगर या गावातील मुक्तिपथ गाव संघटनांची देवनगर येथे केंद्रस्तरीय कार्यशाळा घेण्यात आली होती. त्यावेळी श्रीनगर येथील महिलांनी आपल्या गावात वाहत असलेला दारूचा महापूर थांबवायचा असल्याची इच्छा व्यक्त केली.  इतर गावातील सदस्यांनीही श्रीनगरची दारू बंद करण्यासाठी पाठींबा देण्याचे ठरवले. त्यासाठी नंतर श्रीनगर येथे पोलीस निरीक्षक मिलिंद पाठक यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली. गावातून तक्रार आल्यावर कारवाई करणारच,  अशी हमी यावेळी त्यांनी दिली. यावेळी चारही गावाची मिळून समिती करण्यात आली. चारही गावातील संघटना सदस्य एकत्र मिळून एकमेकांच्या गावातील दारू बंद करण्यासाठी सहकार्य करतील, असे ठरले. पोलीस पाटील आशा मुजुमदार, मोहुर्लीचे सरपंच राजेंद्र वनकर, उदयनगर संघटनेचे अध्यक्ष निमल बाला, देवनगरच्या संघटना अध्यक्ष शांती बनर्जी, श्रीनगरच्या सरपंच हे या बैठकीला उपस्थित होते. मुक्तिपथचे तालुका संघटक जयंत जथाडे व प्रेरक आनंदराव सिडाम यांनी गाव संघटनांना मार्गदर्शन केले.  
चारही गावांच्या संघटना सदस्यांची बैठक झाली त्यावेळी, श्रीनगरमधील दारू बंद करण्यासाठी देवनगर, मोहुर्ली, उदयनगर गावातील महिला मदतीला येतील, तसेच इतर गावात दारू बंद करण्यासाठीही बाकी तीन गावातील महिला सहकार्य करतील असा निर्णय एकमताने घेण्यात आला.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-31


Related Photos