महत्वाच्या बातम्या

 कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या वतीने चार दिवशीय कृषि महोत्सवाचे आयोजन


- जिल्हाधिका-यांच्या हस्ते होणार उद्घाटन
- शेतक-यांना विविध विषयावर मिळणार मार्गदर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या वतीने २३ ते २६ जानेवारी या कालावधित कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व इतर मान्यवरांच्या उपस्थित होणार असून या दरम्यान शेतक-यांना विविध विषयावर प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या महोत्सवाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सेवाग्राम रोडवरील चरखा सभागृह येथे आयोजित कृषि महोत्सवाचे उद्घाटन २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार असून यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, विभागीय कृषि उपसंचालक राजेंद्र साबळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या महोत्सवात पहिल्या दिवशी गोदाम बांधकाम व गोदाम व्यवस्थापन परिषद आयोजित करण्यात आली आहे. २३ जानेवारी रोजी रब्बी हंगाम पीक व्यवस्थापन, हरभरा व तूर मर रोग व्यवस्थापन, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना व व्यवस्थापन, गोदाम बांधणी व व्यवसायातील संधी, गोदाम व्यवस्थापन व ट्रेड, गोदाम नोंदणी व ई वखार पावती, गोदाम बांधणी तांत्रिक मार्गदर्शन, गोदाम बांधकामासाठी बँक कर्ज बाबत मार्गदर्शन होणार आहे. २४ जानेवारी रोजी  तेलबिया पिकाचे व्यावसायिक दृष्ट्या उत्पादन व त्यावरील कीड व रोग व्यवस्थापन, स्मार्ट प्रकल्पांतर्गत कापूस  बाजारभिमुख संमेलन, स्मार्ट कॉटन योजनेबाबत मार्गदर्शन, स्वच्छ कापूस वेचणी व स्मार्ट योजनेबाबत माहिती, सेंद्रिय कपाशी उत्पादन विषयक मार्गदर्शन, कपाशी खरेदी मानके व चर्चा करण्यात येणार आहे. २५ जानेवारी रोजी कृषि विभागातील योजनांची माहिती, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प विषयाची माहिती, पशुसंवर्धन विभागाच्या योजना व अंमलबजावणी बाबत कार्यशाळा घेण्यात येणार आहे. लम्पी रोग व्यवस्थापन, उन्हाळ्यातील चारा व्यवस्थापन, महिलांकरीता हळदीकुंकू कार्यक्रम व आहारात तृणधान्य वापराबाबत चर्चा करण्यात येणार आहे. २६ जानेवारी रोजी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना विषयी माहिती, कृषि पायाभूत सुविधा निधी योजना व नाबार्ड योजनेची  माहिती, इयत्ता ८ ते १० वीच्या विद्यार्थ्यांकरीता चित्रकला स्पर्धा, रेशीम विभागातील योजनेची माहिती, मधुमक्षिका पालन व व्यवसायाची संधी, मत्स्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती व बायोफ्लॉग विषयक माहिती, शेतक-यांचे मनोगत व सत्कार समारंभ आणि प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे. या कृषि महोत्सवात शेतकरी उत्पादक गट, उत्पादक कंपनी, महिला बचत गटांनी उत्पादित केलेले विविध घरगुती पदार्थ शेतमाल प्रक्रीय पदार्थ इत्यादी वस्तू विक्री करीता उपलब्ध असणार आहे तसेच स्टॉल मध्ये योजना निविष्ठा विक्री व खरेदी बाबतचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने शेतकरी, शासकीय अधिकारी, कर्मचारी नागरिकांनी उपस्थित राहून महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आत्माच्या वतीने कळविण्यात आले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos