दंतेवाडा येथे दूरदर्शन वाहिनीच्या टीमवर नक्षली हल्ला, दोन पोलिसांसह दूरदर्शनच्या पत्रकाराचा मृत्यू


वृत्तसंस्था / रायपूर :   छत्तीसगड विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना नक्षलवाद्यांनी दंतेवाडा येथे हल्ला घडवून आणला आहे. दंतेवाडाच्या अरनपूर भागात नक्षलींनी दूरदर्शन वाहिनीच्या टीमवर हल्ला चढवला. यात दोन पोलीस शहीद झाले असून दूरदर्शनच्या कॅमेरामनचा मृत्यू झाला आहे. अच्युतानंद साहू असं कॅमेरामनचं नाव आहे. 
छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातही शनिवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या अशाच प्रकराच्या हल्ल्यात चार जवानांना आपले प्राण गमावावे लागले होते. नक्षवाद्यांच्या हल्ल्यांनी दंतेवाडा, विजापूर जिल्ह्यात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. निवडणुकीचे दिवस असताना नक्षवाद्यांनी सुरू केलेल्या या कारवायांमुळे प्रशासनाचेही धाबे दणाणले आहेत. 
दूरदर्शनची टीम या भागात नेमकी कशासाठी गेली होती याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. ही टीम परतत असताना झाडीत दबा धरून बसलेल्या नक्षलींनी अचानक हल्ला चढवला. नक्षलींच्या हल्ल्याला पोलिसांनीही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. या चकमकीत दोन पोलीस शहीद झाले, तर दोन जण जखमी झाले आहेत.   Print


News - World | Posted : 2018-10-30


Related Photos