रेतीचा ट्रक पकडल्यानंतर कारवाई न करण्यासाठी लाच घेणारा देऊळगाव येथील तलाठी एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
रेती घाटाचे कंत्राट असलेल्या कंत्राटदाराचे रेती वाहतूक करणारे ट्रक पकडल्यानंतर कोणतीही कारवाई न करता सोडून देण्यासाठी लाच रक्कमेचा २० हजारांचा पहिला हप्ता स्वीकारताना आरमोरी तालुक्यातील देउळगाव येथील तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.
मोतीलाल लहूजी राऊत असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. राऊत देउळगाव तलाठी साझा क्रमांक १९ येथे कार्यरत आहे. तक्रारदार हा रेती कंत्राटदार असून रेती घाटावरून त्याच्या ट्रकने रेती वाहतूक करण्यात येत होती. तलाठी राऊत यांनी ट्रक पकडल्यानंतर कोणतीही कारवाई न करण्याकरीता एक लाख रूपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ८० हजार रूपये तसेच पुढील तीन महिन्यात कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याकरीता ४० हजार अशी एकूण १ लाख २० हजार रूपये लाचेची मागणी केली. याबाबत कंत्राटदाराने एसीबीकडे तक्रार केली. सापळा कारवाईदरम्यान लाच रक्कमेचा पहिला हप्ता म्हणून २० हजार रूपयांची रक्कम स्वीकारताना आरमोरी - ब्रम्हपुरी मार्गावरील विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेच्या समोर रंगेहात अटक करण्यात आली. याबाबत आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुध्धलवार, पोलिस उपअधीक्षक विजय माहुरकर, डी. एम. घुगे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक रवी राजुलवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक मोरेश्वर लाकडे, नायक पोलिस शिपाई सतीश पत्तीवार, सुधाकर दंडीकेवार, देवेंद्र लोनबले, महेश कुकडकर, सोनल आत्राम, चालक पोलिस शिपाई तुळशिराम नवघरे यांनी केली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-30


Related Photos