महत्वाच्या बातम्या

 उमेदवारांनी जाहिरातींच्या मजकुराची तपासणी ‘एमसीएमसी’ समितीकडून करून घ्यावी : जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर


- शिक्षक मतदार संघातील प्रचारावर ‘एमसीएमसी’ची करडी नजर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदार संघातील सर्व उमेदवारांनी जाहिरातीच्या मजकुराची तपासणी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीमार्फत (एमसीएमसी) करून घ्यावे. परवानगी घेतल्यानंतरच पत्रक, हस्तपत्रक, भितीपत्रक, फ्लेक्स, इलेक्ट्रॉनिक्स जाहिराती, दूरदर्शन, केबल व समाज माध्यमांवरील जाहिराती प्रसारित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

उमेदवारांनी सर्व मजकूर प्रकाशित करताना केवळ आपली बाजू मांडावी. इतरांवर आरोप प्रत्यारोप करू नये, अशा कोणत्याही वादग्रस्त पत्रकांना एमसीएमसीने परवानगी देऊ नये, असेही त्यांनी सांगितले आहे.

जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात एमसीएमसी समितीचे गठन करण्यात आले आहे. या समितीची करडी नजर अशा चुकीच्या प्रसिद्धी व प्रचार यंत्रणेवर असणार आहे. या संदर्भात एमसीएमसी समितीची बैठक झाली. या बैठकीला उपजिल्हाधिकारी निवडणूक मीनल कळसकर जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, आकाशवाणीचे कार्यक्रमाधिकारी सचिन लाडोले, जेष्ठ पत्रकार अतुल पांडे, दूरदर्शनचे कार्यक्रमाधिकारी मनोज जैन उपस्थित होते. यावेळी काही उमेदवारांनी पाठविलेल्या प्रसिद्धी मजकुराची तपासणी करण्यात आली.

नागपूर जिल्ह्यासाठी एमसीएमसी समितीचे कार्यालय जिल्हा माहिती कार्यालय, तिसरा माळा, प्रशासकीय भवन क्रमांक एक येथे असून कार्यालयीन वेळेत उमेदवारांनी या ठिकाणी संपर्क साधावे. उमेदवारांनी आपल्या जाहिरातींचा मजकूर या ठिकाणी तपासून घ्यावे व त्यासाठी निवडणूक आयोगाने विहित केलेल्या नमुन्यामध्ये अर्ज करावा, असे आवाहनही एमसीएमसी समितीने केले आहे.

उमेदवाराने नोंदणीकृत पक्षाने निवडणूक आयोगाने दिलेल्या नमुना क्रमांकमधील अर्ज करणे आवश्यक आहे. जाहिरात, चित्रपट, अथवा तयार केलेल्या चित्रफिती दोन सीडीमध्ये या ठिकाणी देणे आवश्यक आहे. अर्जासोबत जाहिरातीत दाखवलेल्या स्क्रिप्ट मधील मजकूर जोडणे आवश्यक आहे. जाहिरातीचा खर्च, जाहिरात प्रसारित करण्याचे माध्यम, जाहिरात प्रसारणाचा कालावधी, किती अंक छापणार त्याची माहिती, प्रकाशक कोण आहे, याची माहिती देणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रसारमाध्यमाने व प्रिंटरने उमेदवाराकडून आलेल्या साहित्याला परवानगी असल्याशिवाय प्रसारित करू नये, छपाई करू नये, अशी सूचनाही एमसीएमसीने केली आहे. विनापरवानगी छपाई व प्रसारण केल्यास कलम १७१ भारतीय दंड संहितेनुसार कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos