पुराडा येथील अवैध दारूविक्रेता जयदेव गहाणेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई


- चंद्रपूर येथील जिल्हा कारागृहात रवानगी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील पुराडा येथील जयदेव प्रकाश गहाणे (३०) याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून त्याची चंद्रपूर येथील जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
जयदेव प्रकाश गहाणे याच्यावर जिल्हयातील विविध भागात अवैध देशी - विदेशी दारुची तस्करी करणे, विक्री करणे या सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या त्याच्या विरुध्द ०७ गुन्हे दाखल असुन ०४ गुन्हे हे न्यायप्रविष्ट आहेत. यापुर्वी जयदेव गहाणे याच्यावर २०१७ मध्ये महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ९३ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येवुन सुध्दा त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नाही व तो अवैध दारूची तस्करी व विक्रीचा व्यवसाय करीत होता. प्रतिबंधक कालावधीत देखील त्याच्यावर अवैध दारुविक्री संबंधाने गुन्हा दाखल असुन त्याबद्दल त्याला दोशी ठरवून पाच हजार रुपये दंडाची शिक्षा देण्यात आली होती. तरी देखील त्याचे अवैध दारुची वाहतुक व विक्री करण्याच्या कृत्यात वाढ होत होती. त्यच्यावर कायद्याचे भय असल्याचे दिसुन येत नव्हते. त्याचे कृत्य सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधक ठरत असल्याने पोलीस अधिक्षक, शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधिक्षक, महेंद्र पंडित, उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुराडा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक महाले यांनी जयदेव गहाणे याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभटटी वाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हे, धोकादायक व्यक्ती आणि दृकश्राव्य कला कृतीचे बिना परवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती (व्हीडीओ पायरेट्स), वाळु तस्कर आणी जीवनाश्यक वस्तुंचा काळा बाजार करणारे व्यक्ती यांचे विघातक कृत्यांना आळा घालण्याचा अधिनियम 1981 (एम.पी.डी.ए. अॅक्ट ) नुसार स्थानबध्द करण्याचा प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांना सादर केलेला होता. जिल्हादंडाधिकारी यांनी सदर प्रस्तावास मान्यता देवून जयदेव गहाणे यास स्थानबध्द करण्याचा आदेश निर्गमीत केल्याने त्यास अटक करुन जिल्हा कारागृह, चंद्रपुर येथे स्थानबध्द केले आहे. अवैध दारु व्यवसायास आळा घालण्याकरीता एमपी. डी.ए. अॅक्ट नुसार कारवाया करण्याचे निर्देश पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी जिल्हयातील विवीध पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
News - Gadchiroli | Posted : 2018-10-29