रमाई घरकुल योजनेचे धनादेश काढून देण्यासाठी लाच घेणारा पवनी पंचायत समितीमधील कंत्राटी अभियंता अडकला एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा :
रमाई घरकुल योजनेचे पाच धनादेश काढून देण्यासाठी २ हजार ५०० रूपये लाचेची मागणी करून दोन हजारांची लाच स्वीकारणारा पवनी पंचायत समितीमधील कंत्राटी अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.
अमोल निजपाल चव्हाण (२६) असे लाचखोर कंत्राटी अभियंत्याचे नाव आहे. तक्रारदार पालोरा ता. पवनी येथील रहिवासी आहे. तो मजूरीचे काम करतो. २०१७ - १८ मध्ये तक्रारदाराच्या आईच्या नावे १ लाख ४८ हजार रूपये रमाई घरकुल योजनेसाठी मंजूर झाले होते. पंचायत समितीने प्रथम धनराशी तक्रारदाराच्या आईच्या नावे असलेल्या बॅंक खात्यात जमा केली. उर्वरीत पाच धनादेश मिळविण्यासाठी तक्रारदाराने अभियंता अमोल चव्हाण याला भेटला. यावेळी धनादेश काढून देण्यासाठी चव्हाण याने २ हजार ५०० रूपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने एसीबी चंद्रपूरकडे तक्रार दाखल केली. 
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूरच्या अधिकाऱ्यांनी आज २९ आॅक्टोबर रोजी सापवळा रचला. कारवाईदरम्यान चव्ळाण याने तक्रारदाराकडून तडजोडीअंती दोन हजारांची लाच स्वीकारली. यावरून पवनी पोलिस ठाण्यात कलम ७  (अ) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा (सुधारित) २०१८  अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
सदर कारवाई एसीबी नागपूरचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुध्धलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक प्रतापराव भोसले, पोलिस हवालदार संजय कुरंजेकर, नापोशि गौतम राउत, कोमलचंद बनकर, चालक शिपाई दिनेश धार्मिक आदींनी केली आहे. 

   Print


News - Bhandara | Posted : 2018-10-29


Related Photos