महत्वाच्या बातम्या

 टॅब वाटपाबाबतच्या अपप्रचाराला विद्यार्थ्यांनी बळी पडू नये : महाज्योतीचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : महाज्योतीने संबंधित जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्तांमार्फत टॅब वाटपाचे नियोजन पूर्ण केलेले असून नोंदणीकृत प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब  मिळेल याची दक्षता घेतलेली आहे. त्यामुळे टॅब वाटपाबाबत पसरविल्या जाणाऱ्या अपप्रचाराला विद्यार्थी व पालक यांनी बळी पडू नये, असे आवाहन महाज्योती मार्फत करण्यात आले आहे.

जी, निट, एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब वाटप करण्याची महत्वाकांक्षी योजना महाज्योतीमार्फत राबविण्यात येते. महाज्योतीकडे नोंदणीकृत विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्याचे कार्य महाज्योतीने हाती घेतलेले असून वाटपाच्या  कामास  गती देण्यात आलेली आहे. आजपर्यंत सन 2023 च्या प्रशिक्षणासाठी नोंदणी झालेल्या धुळे, नंदुरबार, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्यात आलेले आहे. तसेच वर्धा जिल्ह्यात सन 2023 व 24 या वर्षाच्या प्रशिक्षणासाठी नोंदणी झालेल्या वर्धा जिल्हयातील विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले आहे.

पुणे, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड सहित इतर उर्वरीत सर्व जिल्हयात JEE/NEET/MHT-CET चे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब वाटप करण्याकरीता संबंधित जिल्ह्यांचे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्तांना नियुक्त करण्यात आले आहे. तसेच वाटपाची प्रक्रीया सुरळीत पार पाडावी, यासाठी लेखी मार्गदर्शक सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

विधानपरिषदेची  शिक्षक व पदवीधर मतदार संघाकरिता निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू असल्याने 4 फेब्रुवारीनंतर उर्वरित विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्हयाच्या ठिकाणी टॅब वाटप करण्यात येणार आहे. टॅब वाटपाचा दिनांक व वेळ महाज्योती कार्यालयामार्फत नोंदणीकृत विद्यार्थ्यांना त्यांच्या संपर्क क्रमांकावर कळविण्यात येणार आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos