वादग्रस्त रामजन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणाची सुनावणी आता जानेवारी २०१९ मध्ये


- सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने  आज केली तहकूब 
वृत्तसंस्था / नवीदिल्ली :
अयोध्येतील   रामजन्मभूमी बाबरी मशीद या  प्रकरणाची सुनावणी आज सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने  तहकूब केली असून पुढील सुनावणी जानेवारी २०१९ मध्ये होईल असे जाहीर केले. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे आणि या अनेक दशके अडकलेल्या महत्त्वाच्या प्रश्नावर निकाल अपेक्षित आहे. पुढच्या वर्षी कधी सुनावणी घेण्यात येईल याची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे.
मशीद हा इस्लामचा अविभाज्य घटक नसल्याचे १९९४ च्या निकालात स्पष्ट करण्यात आले होते. हा प्रश्न मोठ्या खंडपीठाकडे सोपवावा अशी मागणी करण्यात आली होती, जी २७ सप्टेंबर रोजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठानं फेटाळली होती. १९९४ मध्ये एम इस्माइल फारूखी वि. भारत सरकार या प्रकरणामध्ये घटनापीठानं असं निरीक्षण नोंदवलं होतं की नमाज कुठेही अदा करता येत असल्यामुळे मशीद हा इस्लामचा अविभाज्य घटक नाही. तर याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की अयोध्या प्रकरणीचे आधीचे आदेश हे या निकालामुळे प्रभावित झालेले असल्यामुळे या निकालावर मोठ्या घटनापीठानं निर्णय घ्यावा. अयोध्या अॅक्ट १९९३ अंतर्गत रामजन्मभूमी बाबरी मशीद कॉम्प्लेक्समध्ये ६७.७०३  एकर जमीन संपादित करण्यात आली आहे, त्याप्रकरणी करण्यात आलेल्या याचिकेवर निकाल देताना सदर निरीक्षण नोंदवण्यात आले होते.
मात्र, ही मोठ्या घटनापीठाकडे हा प्रश्न नेण्याची याचिका फेटाळताना मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठानं बहुमतानं निकाल दिला की, फारूखी प्रकरणी निकाल देताना मांडलेले निरीक्षण जमीन संपादित करण्यासंदर्भात होता, आणि अन्य खटल्यांमध्ये या निरीक्षणाचा काहीही संबंध नाही. मशीद हा इस्लामचा अविभाज्या भाग नाही; म्हणून इस्लाम पाळण्यासाठी मशीद हा आवश्यक भागच नाही असा मोठा अर्थ त्यातून काढू नये, असंही निरीक्षण यावेळी सरन्यायाधीश दीपक मिश्रा व न्यायाधीश अशोक भूषण यांनी नोंदवलं होतं.   Print


News - World | Posted : 2018-10-29


Related Photos