महत्वाच्या बातम्या

 गोंडवाना विद्यापीठात नवनियुक्त सदस्यांची पहिली अधिसभा खेळीमेळी वातावरणात संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाची  पहिली अधिसभा १७ जानेवारी २०२३  ला अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या अधिसभेचे अध्यक्ष म्हणून कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे  होते. 

या अधीसभेच्या सुरुवातीला नवनियुक्त सदस्यांच्या अभिनंदनचा ठराव मांडण्यात आला. हा  प्रस्ताव  सर्वानुमते पारीत करण्यात आला. अनेक ठरावांवर साधक -बाधक चर्चा झाली. त्यातील काही ठराव सर्वांनुमते पारित करण्यात आले.

गोंडवाना विद्यापीठाद्वारे नवनिर्मित सांस्कृतिक सभागृहाला नागपूर विद्यापीठाचे पूर्व व्यवस्थापन परिषद सदस्य स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर यांचे नाव देण्यात यावे. याविषयीचा ठराव होता.  ठराव बहुमताने पारित करण्यात आला.

राष्ट्रीय छात्र सेने करीता उत्कृष्ट कॅडेट्स व उत्कृष्ट एनसीसी अधिकारी पुरस्कार देण्याबाबतचा प्रस्ताव होता या प्रस्तावाला सर्व सदस्यांनी अनुमोदन दिले आणि सर्व संमतीने हा ठराव मंजूर करण्यात आला.

चिमुर येथे विद्यापीठाचे सुविधा केंद्र व पेपर मूल्यांकन केंद्र निर्माण  करण्याबाबतच्या  प्रस्तावाला  उत्तर देतांना कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले, चिमूर येथे सुविधा केंद्र सुरू करण्याच्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता देण्यात आली असून पेपर मुल्यांकन मूल्यांकन  केंद्र सुरू करण्याच्या प्रस्ताव संबंधीत प्राधीकरणात ठेवण्यात येईल.

वसतिगृहातील विद्यार्थिनींना स्वतःचे रक्षण करण्याकरिता स्वरक्षणाचे धडे देण्याबाबतच्या प्रस्तावाचा ठराव मांडण्यात आला तसेच  तसेच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत आचार्य पदवी मार्गदर्शकांकरिता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात यावे असे दोन्ही  ठराव सर्वांनूते पारित करण्यात आले.

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित महाविद्यालयातील अध्यापकांच्या विविध समस्या आणि प्रश्न विद्यापीठाकडे मांडण्यासाठी व त्या  सोडवणुकीसाठी  विद्यापीठाने ऑनलाईन पोर्टल तयार करावे असा प्रस्ताव होता या प्रस्तावला होकार दर्शवत कुलगुरू महोदयांनी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्याचे मान्य केले.

गोंडवाना विद्यापीठात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे अध्यासन केंद्र सुरू करण्याच्या प्रस्तावावर बोलतांना कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले, संत तुकाराम महाराजांचे साहित्य व विचार याबाबत व्यापक अध्ययन व संशोधन होणे गरजेचे आहे. त्यासाठी गोंडवाना विद्यापीठात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे अध्यसन केंद्र सुरू करण्यात महत्त्वाचे वाटते. संत तुकाराम महारांजाच्या काव्याच्या आधारे समकालीन इतिहासाचे संशोधन विद्यार्थ्यांना करण्यास व आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी संत तुकाराम महाराजांच्या काव्यातील विचार प्रेरक  ठरतील असे म्हणत हा ठराव पारीत करण्यात आला. ते पुढे म्हणाले की, या विषयाचा प्रस्ताव पाठवून याबाबत शासनाकडे पाठपुरावा करता येईल. 

गोंडवाना विद्यापीठामध्ये बार्टी सारखे प्रशिक्षण संस्था स्थापन करणे या बाबतच्या  प्रस्थावावर बोलतांना कुलगुरू म्हणाले की, पुण्या मुंबई पर्यंत आपल्या विद्यार्थी प्रशिक्षणासाठी पोचू शकत नाही त्यामुळे एमपीएससी आणि युपीएससी च्या पुर्व तयारी करिता सारथी चे तसेच टीआर टीआय चे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचे आश्वासन देत प्रस्ताव मान्य केला .

अधीसभा सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नोत्तराच्या तासात विद्यापीठ विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक प्रश्नांवर संगोपन चर्चा करण्यात आली.

ही अधीसभा सकाळी ११.३० ला सुरू झाली तर  कामकाज रात्री नऊ वाजेपर्यंत चालले. या सभेचे सदस्य सचीव म्हणून कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी काम पाहिले तसेच प्र-कुलगुरू  डॉ. श्रीराम कावळे यावेळी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos