एसबीआय खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी : घरबसल्या अपडेट करा केवायसी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने आपल्या सर्व ग्राहकांनी 31 मेपर्यंत केवायसी अपडेट करावे अशी अधिसूचना जारी केली आहे. देशातील कोरोना परिस्थितीमुळे यासाठीची मुदत 31 मेपर्यंत वाढवण्यात आली असून 31मेपर्यंत केवायसी अपडेट न केल्यास आपल्या खात्याची सेवा बंद होऊ शकते. या मुदतीतदेखील केवायसी न करणाऱ्या ग्राहकांची खाती फ्रीज केली जातील, असे बँकेने स्पष्ट केले आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात ठिकठीकाणी लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना घराबाहेर पडून आपल्या बँक शाखेत येणं अडचणीचं ठरू शकते. हे लक्षात घेऊन, बँकेनं ग्राहकांना त्यांची कागदपत्रे पोस्ट किंवा ईमेलद्वारे बँकेत पाठवून केवायसी अपडेट करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे विविध कारणांनी केवायसी करणे रखडलेल्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. ग्राहकांच्या केवायसी अपडेट्सची कागदपत्रे ई-मेल किंवा पोस्टाने आल्यास ती स्वीकारण्याची सूचनाही बँकेने आपल्या सर्व 17 स्थानिक मुख्यालयांना दिल्या आहेत. ज्या खात्यांचे केवायसी अपडेट झालेले नाही, अशी खाती 31मे पर्यंत फ्रीज करू नयेत, अशी स्पष्ट सूचना बँकेनं आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
केवायसी म्हणजे नो युवर कस्टमर अर्थात कोणत्याही बँकेत आपले खाते उघडले की खातेदाराला त्याचा मोबाइल नंबर, संपर्क क्रमांक, आधार क्रमांक, पॅनकार्ड, पत्ता, ईमेल आदी माहिती द्यावी लागते. यात काही बदल झाल्यास त्याबाबतही बँकेला वेळोवेळी कळवणे आवश्यक असते.
आतापर्यंत केवायसी अपडेट नसेल तर लगेच खातेदाराचे खाते फ्रीज करण्यात येत होते, आता ही प्रक्रिया 31मेपर्यंत केली जाणार नाही, असेही बँकेने स्पष्ट केले आहे. हा आदेश तात्काळ लागू करण्यात आला आहे.
बँक आपल्या ग्राहकांचे मूल्यांकन जोखमीच्या आधारावर करते. ज्या ग्राहकांबाबत अधिक जोखीम असते अशा ग्राहकांना दोन वर्षातून एकदा केवायसी अपडेट करणं आवश्यक असते. ज्या ग्राहकांची जोखीम कमी असते त्यांना आठ वर्षातून एकदा केवायसी अपडेट करावे लागते. ज्या ग्राहकांची जोखीम अगदीच कमी असते त्यांना दहा वर्षातून एकदा केवायसी अपडेट करावे लागते.
  Print


News - World | Posted : 2021-05-04


Related Photos