गेल्या २४ तासांत राज्यातील ५९ हजार ५०० रुग्ण झाले बरे


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातून दिलासादायक वृत्त आहे. आज नव्या कोरोना बाधितांचा आकडा 50 हजारपेक्षा खाली आला आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 48,621 नवे कोरोना बाधीत समोर आले आहेत. तर याच काळात 567 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून 59,500 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
आतापर्यंत राज्यात तब्बल 47,71,022 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या राज्यात 6,56,870 एवढे सक्रीय रुग्ण आहेत. यापूर्वी रविवारी राज्यात (महाराष्ट्र) 51,356 नवे कोरोना बाधित समोर आले होते. तर 669 जणांचा मृत्यू झाला होता.
"किती ऑक्सिजन आहे, हे सांगू नका; किती सप्लाय झाला ते सांगा", भाजप खासदाराचा सरकारला घरचा आहेर
राज्याची राजधानी मुंबईलाही सोमवारी मोठा दिलासा मिळाला. गेल्या 24 तासांत मुंबईत कोरोनाचे तब्बल 2,662 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 78 जणांचा मृत्यू झाला आहे. महत्वाचे म्हणजे गेल्या 24 तासांत मुंबईत जेवढे कोरोना बाधित आढळून आले आहेत त्यांपेक्षा दुप्पट रुग्ण बरे होऊन घरीही गेले आहेत. सोमवारी मुंबईत 5,746 रुग्ण बरे झाले आहेत.
मुंबई पालिकेकडे लसीचा साठा अपुरा असल्याने सोमवारी 45 वर्षांवरील लोकांचे लसीकरण होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 18 ते 44 वयोगटातील लसीकरण सोमवारी नायर, बीकेसी, सेव्हर हिल, राजावाडी आणि कुपरमध्ये सुरू राहील. मात्र, यासाठी ज्यांनी आधीच नोंदणी केली आहेत त्यांनाच येथे लस मिळेल.
सध्या 63 केंद्रे, तसेच 73 खासगी रुग्णालये मिळून 136 लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पाच केंद्रांवर सुरू राहील. तेथे या वयोगटातील प्रत्येकी 500 नागरिकांचे रोज सकाळी 9 ते 5 या वेळेत लसीकरण केले जाईल. सध्या तेथे लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांनाच प्राधान्य आहे. साठा उपलब्ध होईल, त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असे महापालिकेने स्पष्ट केले.
  Print


News - Rajy | Posted : 2021-05-04


Related Photos