महत्वाच्या बातम्या

 मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या अंतर्गत २३ ते २५ जानेवारी दरम्यान ग्रंथप्रदर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

वृत्तसंस्था / मुंबई : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याअंतर्गत 23 ते 25 जानेवारी या कालावधीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असल्याचे मराठी भाषा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

ग्रंथप्रदर्शनासाठी शासकीय प्रकाशनाबरोबरच खासगी प्रकाशकांनाही सहभागी करुन घेण्यात येणार आहे.

त्यासोबतच ग्रंथप्रदर्शनादरम्यान मंत्रालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सकाळी 11 वाजता मंत्रालयात मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या/ मराठी भाषेत लिखाण करणाऱ्या पाच अधिकारी/ कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. यानंतर सकाळी 11 वा. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि स्पर्धक मंत्रालयीन अधिकारी/कर्मचारी यांना चालता बोलता – प्रश्न सरिता या कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे.

24 जानेवारी 2023 रोजी दुपारी 2 वा. परिषद सभागृह, 6 वा मजला, मंत्रालय येथे अभिवाचन स्पर्धा होणार असून त्यात मंत्रालयीन अधिकारी - कर्मचारी सहभागी होतील.

25 जानेवारी 2023 रोजी दुपारी 4 वा. ‘हास्यसंजीवनी’ हा कार्यक्रम असणार आहे. अभिवाचन स्पर्धेचा बक्षिस समारंभ व समारोपाचा कार्यक्रम सायं. 5.30 वा. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव यांच्या उपस्थित होईल, असे मराठी भाषा विभागाने कळविले आहे.





  Print






News - Rajy




Related Photos