'वन बूथ-२५ युथ' हे भाजपचे धोरण, आगामी निवडणुकीची चिंता नाही : खा. रावसाहेब दानवे


- पत्रकार परिषदेत दिली माहिती 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली :
भारतीय जनता पक्षाने राज्यात विकासकामांसह पक्षसंघटनेकडेही लक्ष दिले. आगामी  निवडणुकीची संघटनात्मक बांधणी करताना 'वन बूथ-२५ युथ' हे  धोरण अवलंबिले. या अंतर्गत एका युथकडे ६० मतदारांना भाजपाकडे वळविण्याची जबाबदारी दिली. हे युथ   मतदारांना मतदान करण्यासाठी घेऊन जातील, यामुळे भारतीय जनता पक्षाला आगामी निवडणुकीची चिंता नाही, अशी माहिती भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. 
गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्रातील पक्ष संघटन व बूथ रचनेचा आढावा घेण्यासाठी खा.दानवे आज गडचिरोलीत आले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष खासदार अशोक नेते, जि.प.अध्यक्षा योगीता भांडेकर, चिमूरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया, आ.कृष्णा गजबे, आ. डॉ. देवराव होळी, आ.संजय पुराम, माजी आमदार प्रा.अतुल देशकर, लोकसभा विस्तारक बाबूराव कोहळे,  जिल्हा उपाध्यक्ष रेखा डोळस यांच्यासह पक्षाचे निवडक पदाधिकारी उपस्थित होते.  
पुढे बोलताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने यश मिळविले. यानंतर सहा महिन्यांनी  विधानसभा निवडणुका झाल्या. यामध्येसुद्धा भाजपच वरचढ ठरले.  त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या , महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकांनतर भाजप हा देशातील सर्वांत मोठा पक्ष ठरला. राज्यात ५ हजार सरपंच भाजपचे निवडून आले. १५ महानगरपालिका, १२ जिल्हा परिषदांवर भाजपाची सत्ता आली.  सरकार आल्यानंतर पक्षसंघटनेकडे दुर्लक्ष होते. परंतु भाजपने दोन्हीकडे लक्ष दिलं. त्यामुळेच आज विधानसभेच्या २८८ मतदारसंघांमध्ये २८८ विस्तारक व लोकसभेच्या ४८ क्षेत्रांमध्ये वेगळे विस्तारक आहेत. राज्यात ९१ हजार ४०० बूथ आहेत. त्यापैकी भाजपने ८८ हजार बूथप्रमुखांची नेमणूक केली आहे. त्यापैकी ८३ हजार बूथप्रमुखांची पडताळणी आम्ही प्रत्यक्ष संपर्क साधून  पूर्ण केली आहे, अशी माहिती खा.दानवे यांनी दिली.
  एका विधानसभेत सरासरी ३०० बूथ असे गृहित धरले तर एका विधानसभेत ७ हजार ५०० कार्यकर्ते नेमले जात आहेत. एका युवकाला ६० मतदारांची जबाबदारी देण्यात आली असून, मतदानाच्या दिवशी १० वाजताच्या आत आमचे युवक कार्यकर्ते मतदारांना मतदान करायला घेऊन जाणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला अजिबात चिंता नाही, असे खा.दानवे यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-27


Related Photos