महत्वाच्या बातम्या

 मतदार जागृती सप्ताह जिल्हाभर प्रभावीपणे राबवा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


- २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : भारत निवडणूक आयोगाचा २५ जानेवारी हा स्थापना दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणुन संपूर्ण देशभर साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यासोबतच मतदार जनजागृती सप्ताह देखील जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.

मतदार दिन व जागृती सप्ताहाच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, उपजिल्हाधिकारी मनोजकुमार खैरनार, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, हरीष धार्मिक, शिल्पा सोनाले, माध्यमिक जिल्हाधिकारी सचिन जगताप, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे, तहसिलदार रमेश कोळपे आदी उपस्थित होते.

नवमतदारांना नाव नोंदणीसाठी प्रोत्साहन देणे, सुलभरित्या त्यांची नोंदणी करुन घेणे या उद्देशाने मतदार दिन, जागृती सप्ताह राबविल्या जात आहे. सप्ताहांतर्गत २५ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधित जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये मतदार नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात यावी. यासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे सहकार्य घेण्यात यावे. घोषवाक्य, भिंती पत्रके, रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात याव्या, अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत केल्या.

शाळा महाविद्यालयांमध्ये मतदार दिन साजरा करावा. विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण या दिवशी करण्यात यावे. विद्यार्थ्यांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्यासंबंधी शपथ देण्यात यावी, असे बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या दिवशी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, नायब तहसिलदार, मतदान केंद्रस्तरीय यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यावर्षी राष्ट्रीय मतदार दिनाचे थीम माझं मत - माझं भविष्य ही आहे.





  Print






News - Wardha




Related Photos