गडचिरोली येथील महिला व बाल रूग्णालयाच्या अतिदक्षता कक्षात कर्मचाऱ्यांचे ’बर्थ डे’ सेलिब्रेशन, कारवाईचे संकेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
दीपक बोलीवार/ गडचिरोली:
येथील महिला व बाल रूग्णालयात काल २६ आॅक्टोबर रोजीच्या रात्री १२ वाजता नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्षात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी मिळून वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला असून या प्रकारावर रुग्णालय प्रशासन नेमकी कोणती कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.
महिला व बाल रूग्णालयात जिल्ह्यातील तसेच बाहेर जिल्ह्यातील रूग्णांचीसुध्दा प्रचंड गर्दी असते. योग्य उपचार मिळेल या हेतूने येथे लहान मुलांना व महिलांना दाखल केले जाते. गरोदर माता आणि बालकांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. मात्र कर्मचारी आणि अधिकारी नियमांचे उल्लंघन करतांना दिसून येत आहेत. रूग्णांचे नातेवाईक जराही जोराने बोलतील तरी त्यांच्यावर दबाव टाकून शांत केले जाते. मात्र कर्मचाऱ्यांवर कुणाचेही नियंत्रण नसल्यानेच गोंधळ घालून वाढदिवस साजरे केले जाण्याचे प्रकार केले जात असल्याचे रूग्णांच्या नातेवाईकांमधून बोलल्या जात आहे. 
काल २६ आॅक्टोबर रोजी एका महिला  कर्मचाऱ्याचा वाढदिवस होता. यामुळे रात्री १२ वाजता अतिदक्षता कक्षातच गोंधळ घालत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यामुळे लहान बालके तसेच महिला रूग्णांना मनस्ताप सहन करावा लागला.
याबाबत रूग्णालयाचे अधीक्षक डाॅ. सोयाम यांना विचारणा केली असता त्यांनी सबंधितांवर कारवाईचे संकेत दिले आहे. सदर प्रकाराबाबत जिल्हा शल्य चिकीत्सकांना माहिती देवून समिती स्थापन करू समितीच्या चौकशीनंतर दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती डाॅ. सोयाम यांनी विदर्भ न्यूज एक्सप्रेसशी बोलताना दिली आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-27


Related Photos