आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
राज्य मंत्रिमंडळाची बैठक  आज मुंबईत होत असून या बैठकीकडे सगळ्यांचे  लक्ष लागले आहे. सध्या कोरोनाबाबत नियमावली राज्यात लागू केली असून त्याचा फारसा प्रभाव होत नसल्याची नाराजी काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर बोलून दाखवली आहे. त्यानंतर विद्यमान नियमावलीमध्ये बदल करण्याचे संकेतही मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीमध्ये राज्यातील लॉकडाऊन आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
राज्यात लागू असलेल्या निर्बंधांमध्येही किराणा दुकाने पूर्ण वेळ सुरू होती. त्याची वेळ कमी करत सकाळी सात ते अकरा अशी वेळ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे इतर अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या वेगवेगळ्या यंत्रणा सुद्धा कमी करण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती समोर येत आहे.
मागील सात ते आठ दिवसांपासून कडक निर्बंध लादण्यात आले असले तरीही त्याचा फारसा फायदा होत नसल्याचे दिसून येत आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अधिक कठोर निर्णय घेतले तर कदाचित रुग्ण संख्या कमी होण्याची शक्यता आहे. यामुळेच राज्य मंत्रिमंडळामध्ये यावर आज विचारमंथन होईल, असे समजते.
दरम्यान, राज्यामध्ये रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन सिलेंडरचाही पुरवठा कमी आहे. यावरही मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या मुद्द्यांवरून राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरू आहे. त्याच धर्तीवर आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही प्रमुख विषयांवर चर्चा होऊन निर्णय होणे अपेक्षित आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2021-04-20


Related Photos