'बेड द्या, अन्यथा इंजेक्शन देऊन आमचा जीव घ्या' : ऑक्सिजन-व्हेंटिलेटर बेडसाठी रुग्णाची अ‍ॅम्ब्युलन्समधून ४०० किमी प्रवास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
कोरोना बाधितांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होत नसल्यामुळे वरोरा येथील एका गंभीर रूग्णाला चोवीस तासात वरोरा-चंद्रपूर-तेलंगणा-चंद्रपूर असा ४०० किलोमीटरचा प्रवास ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरसाठी करावा लागला आहे. दरम्यान, त्याला चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून बऱ्याच प्रयत्नांनंतर अखेर त्यांना फक्त ऑक्सिजन बेड उपलब्ध होऊ शकला आहे. त्यामुळे संतापलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णाला सामान्य रूग्णालयासमोर ठेवून “बेड द्या, अन्यथा इंजेक्शन देऊन आमचा जीव घ्या”, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनावर संताप व्यक्त केला.
चंद्रपूर जिल्ह्यात करोना रूग्णांची संख्या दररोज वाढत असून १ हजारांच्या वर रूग्णसंख्या पोहोचली आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रूग्णालयात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या खाटा हाऊसफुल्ल आहेत. विशेष म्हणजे ऑक्सिजनची गरज असलेल्या गंभीर करोना रूग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने त्यांना रूग्णवाहिकेतच ताटकळत राहावे लागते. अन्यथा तेलंगणा राज्यात किंवा इतर जिल्ह्यात आधार शोधावा लागत आहे.
मंगळवारी वरोरा येथील एका बाधित रूग्णाला नातेवाईकांनी वरोरा उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने त्याला चंद्रपूर येथे नेण्यास सांगितले. नातेवाईकांनी चंद्रपुरातील जिल्हा सामान्य रूग्णालय तसेच शहरातील सर्व खासगी रूग्णालये पालथी घातली. मात्र, कुठेही ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची खाट उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे नातेवाईकांनी तेलगंणा येथे ऑक्सिजन खाट मिळेल आणि उपचार होईल या आशेने रूग्णाला घेऊन तेलंगणा राज्यातील मंचेरिअल गाठले. मात्र, तेथेही निराशाच पदरी आली.
तिथून नातेवाईकांनी रुग्णाला परत चंद्रपूर येथे हलवले. यावेळी रूग्णाची प्रकृती गंभीर असल्याने व्हेंटिलेटरच्या रूग्णवाहिकेत आणले गेले. चंद्रपूरला कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने बराच वेळ रूग्णवाहिका हॉस्पिटलसमोर उभी होती. त्यानंतर रूग्णवाहिका चालकाच्या मदतीने नातेवाईकांनी हॉस्पिटलमधील एका खोलीत रूग्णाला ठेवले.
  Print


News - Chandrapur | Posted : 2021-04-15


Related Photos