कोरोना व्हायरस दीर्घकाळ जगात राहणार : डब्लूएचओ प्रमुखांचा सावध राहण्याचा इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : 
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी जगाला कोरोना व्हायरसपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. कोरोना व्हायरस दीर्घकाळ जगात राहणार आहे, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. आशिया आणि मध्यपूर्वेतील बर्‍याच देशांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जगभरात 78 कोटी लोकांना आतापर्यंत लस दिली आहे, मात्र तरीही कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 
मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, टेस्टिंग करणे आणि आयसोलेशनमध्ये राहणे अशा सार्वजनिक आरोग्याच्या उपायांवर  पुन्हा जोर दिला जात आहे. टेड्रोस म्हणाले की लस घेतल्यानंतर बेजबाबदारपणे वागू नये. रोज काळजीपूर्वक वागणे गरजेचं आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन केल्यास कोरोनावर मात केली जाऊ शकते, हे जगातील बर्‍याच देशांनी दाखवून दिले आहे.
टेड्रोस यांच्या म्हणण्यानुसार, कोविडला रोखण्यात बरेच देश यशस्वी झाले आहेत. त्यामुळे ते देश आनंदोत्सव साजरा करत आहेत, अनेक कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत.  पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. सर्व देशांमध्ये पुन्हा प्रवास आणि व्यापार सुरू व्हावेत अशी त्यांची इच्छा आहे. परंतु आता जेव्हा काही देशांमध्ये मृतांचा आकडा वाढत आहे तेव्हा लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
कोरोनाचं संकट दीर्घकाळ आपल्याबरोबर राहणार आहे. परंतु आपण सकारात्मक राहिलं पाहिजे. या वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत कोरोना बाधित रुग्णसंख्येत आणि मृत्यूंमध्ये घट झाली होती. म्हणूनच कठोर पावलं उचलण्याची आवश्यकता आहे आणि लसीकरणाची गरज आहे. जेणेकरुन काही महिन्यांतच कोरोना महामारी नष्ट होऊ शकते.
  Print


News - World | Posted : 2021-04-14


Related Photos