महत्वाच्या बातम्या

 नागपूर मनपाचे विद्यार्थी उडविणार उपग्रहाचा पतंग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : महापालिकेच्या शाळेतील मुलांनी वारंवार गुणवत्ता सिद्ध करीत यशाचा झेंडा रोवला आहे. याच मालिकेत आता पुन्हा एकदा महापालिका शाळांतील २० मुलांनी आपली गुणवत्ता सिद्ध करीत लघु उपग्रह निर्मितीचे धडे घेण्यासाठी पाऊल पुढे टाकले आहे. ही मुले पुढील महिन्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्त्रो) उपग्रह निर्मितीची प्रक्रिया जवळून बघणार आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे अंतराळात सोडले जाणारे उपग्रह, त्यांचे तंत्रज्ञान, संशोधन हा विषय नेहमीच मुलांच्या उत्सुकतेचा असतो. अंतराळातील विविध घटना, घडामोडी नेहमीच मुलांच्या आकर्षणाचा विषय राहिला आहे. महापालिकेच्या शाळेतील मुलेही अपवाद नाही. या मुलांनीही इस्त्रोमध्ये जाण्यासाठी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. महापालिकेच्या विविध शाळांतील २० मुलांची निवड इस्त्रोमध्ये जाण्यासाठी करण्यात आली आहे.

महापालिकेच्या शिक्षण विभागाने मागील आठवड्यात ४० मुलांची चाचणी घेतली. यातील नववी व दहावीतील २० मुलांची निवड करण्यात आली. २१ फेब्रुवारीला रामेश्वरम येथे इस्त्रो मोठे उपग्रह अंतराळात सोडणार आहे. यासोबत एक लघु उपग्रहही सोडणार आहे.

ही मुले पुढील महिन्यात १५ तारखेला नागपुरातून जाणार असून इस्‍त्रो संस्थेत तीन ते चार दिवस स्पेस सायन्सचे धडे गिरवणार आहे. यादरम्यान या मुलांना लघु उपग्रह कसा तयार करतात, तो अंतराळात कसा सोडतात, ही सर्व प्रक्रिया जवळून बघता येणार असून त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरेही शोधणार आहेत.





  Print






News - Nagpur




Related Photos