कारच्या धडकेने टेम्पोखाली येऊन तरुणीचा मृत्यू


- औरंगाबाद शहरातील उस्मानपुरा भाजीवाली बाई चौकातील घटना 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / औरंगाबाद :
महाविद्यालयात जाण्यासाठी निघालेल्या विद्यार्थिनीच्या दुचाकीला भरधाव झायलोने मागून जोरात धडक बसताच विद्यार्थिनी रस्त्यावर पडली. त्याच वेळी समोरून वेगात आलेल्या विटांच्या टेम्पोने तिला चिरडल्याची घटना बुधवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास उस्मानपुरा भाजीवाली बाई चौकात घडली . 
वैभवी सुनील खिरड ( १६) असे मृत तरुणीचे नाव असून ती शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मेकॅनिकल शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होती.
बुधवारी सकाळी  साडेआठच्या सुमारास तिच्या मोपेडवर (एमएच २० बीआर ०१९१) महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली होती. शहानूरमियाँ दर्गा चौकाकडून ती पीर बाजारच्या दिशेने निघाली. पीर बाजारच्या अलीकडील चौकात भाजीवाली बाई पुतळा चौकासमोर अाल्यानंतर वैभवीच्या दुचाकीला पांढऱ्या रंगाच्या झायलो एसयूव्ही वाहनाने मागून जोरात धडक दिली. धडक बसताच वैभवीचा तोल गेला व ती रस्त्यावर कोसळली. त्याच वेळी तंत्रनिकेतन महाविद्यालयाकडून भाजीवाली बाई चौकाकडे भरधाव येणाऱ्या विटांचा टेम्पो वैभवीला चिरडून गेला. या भीषण अपघातात तिचा जागेवरच मृत्यू झाला.  याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून दोन्ही वाहनचालकांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.  

   Print


News - Rajy | Posted : 2018-10-25


Related Photos