शिवस्मारकाच्या पायाभरणीला जाणाऱ्या बोटीला अपघात : एकाच बुडून मृत्यु, २४ जणांना वाचवले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  मुंबई :
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील नियोजित भव्य स्मारकाच्या पायाभरणी समारंभाला जाताना स्पीड बोटीला अपघात होऊन शिवसंग्राम संघटनेच्या एका कार्यकर्त्याचा बुडून मृत्यू झाला. तर बोटीतील २४ जणांना वाचवण्यात यश आले. बोटीचा चालक अत्यंत वेगाने बोट चालवत होता त्यामुळेच अपघात झाल्याचे बोलल्या जात आहे . 
 पायाभरणीसाठी ४ बोटी गेटवेवरून जेट्टीवरून निघाल्या. एक बोट किनाऱ्यापासून ३ किमी समुद्रात खडकावर आपटून बुडू लागली. बोटीत मंत्री चंद्रकांत पाटील यांचे ओएसडी श्रीनिवास जाधव, शिवस्मारक प्रकल्पाचे अभियंता श्याम मिसाळ व शिवसंग्रामचे २० कार्यकर्ते होते. जाधवांनी आमदार जयंत पाटलांना फोन केला. पाटील यांनी तत्काळ मदतीसाठी २ बोटी पाठवल्या. दरम्यान, तटरक्षक दलाची २ हेलिकाॅप्टर्स आली. पीएनपीच्या दोन बोटीही अपघातस्थळी पोचल्या. सर्व पीएनपीच्या बोटीत चढले. तोवर एक जण समुद्रात बुडाला. बोटीतील अनेकांनी लाइफ जॅकेट घातले नव्हते, अशी माहिती आहे.
सांताक्रुझ येथील शिवसंग्रामचा बुडालेला कार्यकर्ता सिद्धेश पवार याचे चार महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. मूळचा कोकणातील खेडचा तो रहिवासी आहे. त्याचा मृतदेह बुडालेल्या बोटीत सापडला. पवार याच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. विक्रांत आमरे (५०), अशोक लोधा (५३) हे दोघे बुडालेल्या स्पीड बोटीत होते. दोघांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने ते गंभीर होते. त्यांच्यावर सेंट जाॅर्ज रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
   Print


News - Rajy | Posted : 2018-10-25


Related Photos