महत्वाच्या बातम्या

 फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले नसल्याचा पालकांचा गंभीर आरोप : शारदाश्रम शाळेने आरोप फेटाळले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : शाळेची फी भरली नाही म्हणून विद्यार्थिनीला परीक्षेला बसू दिले नाही. तसेच तिला अपमानित केले, असा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. मुंबईतील दादरच्या शारदाश्रम इंटरनॅशनल स्कूलमध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी विद्यार्थिनीच्या पालकांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून या प्रकरणात गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तर विद्यार्थिनीला अपमानित केल्यासंबंधी आरोप शाळेने फेटाळले आहेत. वर्षभरापासून फी न भरल्याने विद्यार्थिनीला चाचणी परीक्षेला बसू दिले नाही, असे स्पष्टीकरण शाळेने दिले आहे.


मुलीला परीक्षेला बसू न देता दुसऱ्या रुममध्ये ठेवले : पालकांचा आरोप

ही मुलगी दुसरीच्या वर्गात शिकते. आपल्या मुलीला शाळेची फी भरली नाही म्हणून घटक चाचणी परीक्षेला बसू न देता दुसऱ्या एका रुममध्ये ठेवण्यात आले. शिवाय त्रास देऊन अपमानित करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थिनीचे पालक मृगेंद्र राणे यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी शाळेच्या विरोधात दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसंच गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली आहे.


विद्यार्थिनीला अपमानित केले नाही, स्टाफ रुममध्ये शिक्षकांसोबत बसवले, शाळेचे स्पष्टीकरण

यावर शाळेची बाजू देखील समोर आली आहे. मागील वर्षापासून या पालकांनी आपल्या मुलीची शाळेची फी भरली नसून वारंवार शाळेची फी भरावी यासाठी त्यांना सूचना करण्यात आल्या होत्या. शिवाय त्यांना भेटण्यासाठीही बोलावण्यात आले होते. मात्र तरीसुद्धा पालक फी भरण्यास तयार नसल्याने या विद्यार्थिनीला घटक चाचणी परीक्षेला बसू दिले नाही, असे शाळेचे म्हणणे आहे. शिवाय या विद्यार्थिनीला कुठल्याही प्रकारे अपमानित केले नसून या मुलीला ज्या दिवशी चाचणी परीक्षेला बसू दिले नाही तेव्हा स्टाफ रुममध्ये शिक्षकांसोबत ही मुलगी बसल्याचे शाळेचे अध्यक्ष गिरीराज शेट्टी यांनी सांगितले. 

तसेच शारदाश्रम इंटरनॅशनल स्कूल ही शाळा विनाअनुदानित असल्यामुळे पालकांकडून मिळणाऱ्या फी मधूनच या शाळेचे काम केले जाते. शिक्षकांचे पगार दिले जाते. त्यामुळे पालकांनी जबाबदारी ओळखून वेळेवर फी भरावी, अशी प्रतिक्रिया शाळेकडून देण्यात आली आहे.





  Print






News - Rajy




Related Photos