आदिवासी विद्यार्थी संघही उतरणार गडचिरोली - चिमूर लोकसभेच्या रिंगणात ?


- मोर्चेबांधणीला सुरूवात
- उमेदवाराची चाचपणी सुरू
- राजकीय वर्तूळात चर्चेला उधाण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
२०१९ मध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. जिल्ह्यात प्रमुख राजकीय पक्षांसह इतरही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते गावा - गावांमध्ये जावून जनतेची मते मत्तांतरे जाणून घेत आहेत. अशातच राजकीय वर्तूळात नवे समिकरण उभे ठाकण्याची शक्यता दिसून येत असून जिल्ह्याच्या राजकारणात  महत्वाची भूमिका निभावणाऱ्या आदिवासी विद्यार्थी संघानेही लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती  विश्वसनिय सूत्रांकडून मिळाली  आहे. 
गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रात २०१४ च्या निवडणूकीत भाजपाने वर्चस्व प्रस्थापित केले. खा. अशोक नेते यांनी विजयश्री मिळवून काॅंग्रेसचे उमेदवार डाॅ. नामदेव उसेंडी यांचा पराभव केला होता. आता २०१९ च्या निवडणूकीसाठी काॅंग्रेसकडून डाॅ. नितीन कोडवते यांच्या नावाची जोरदार चर्चा असून त्यांनी गावा - गावांमध्ये जावून जनसंपर्क वाढविण्यास प्रारंभ केला आहे. भाजपा तसेच इतरही पक्षांनी आपआपल्या परीने जनसंपर्क सुरू ठेवला आहे. या सर्व घडामोडींमध्ये आदिवासी विद्यार्थी संघ आगामी निवडणूकीत कोणत्या पक्षाला पाठींबा देते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र आदिवासी विद्यार्थी संघाने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेत उमेदवाराची चाचपणी सुरू केली असल्याचे कळते. यामुळे राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच लोकसभा क्षेत्रात निवडणूकसुध्दा रंगतदार होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विद्यार्थी संघाचा संपर्क उत्तम आहे. अहेरी उपविभागातील बहूतांश जिल्हा परिषद क्षेत्र, पंचायत समिती गण आणि ग्रामपंचायती आविसच्या ताब्यात आहेत. दुर्गम भागातील जनतेशी सुध्दा आविसचा संपर्क आहे. या भागात स्थानिक दुर्गम गावांमध्ये आविस नेत्यांचा संपर्क दांडगा आहे. यामुळे आविसचा जनाधार पाहता लोकसभा निवडणूकीची रंगत पाहणे औत्सुक्याचे ठरू शकते.  
गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रात सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. यामध्ये गडचिरोली, अहेरी, आरमोरी, चिमूर, ब्रम्हपुरी आणि देवरी हे विधानसभा क्षेत्र येतात. यापैकी पाच विधानसभा क्षेत्र भाजपाच्या ताब्यात आहेत. तर ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र काॅंग्रेसच्या ताब्यात आहे.  आता आदिवासी विद्यार्थी संघ लोकसभा निवडणूकीसह विधानसभाही लढविण्याची चर्चा आहे. गडचिरोली जिल्ह्यातील तिनही विधानसभा क्षेत्र आदिवासी विद्यार्थी संघ लढविण्याची शक्यता वर्तविली जात आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-24


Related Photos