महत्वाच्या बातम्या

 गावातच करणार महिला एफटीकेकिटव्दारे पिण्याच्या पाण्याची जैविक व रासायनिक तपासणी


- मोहाडी व तुमसर येथील महिलांना पाणी तपासणी एफटीके किटचे प्रात्यक्षिक

- मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एम कुर्तकोटी यांचे हस्ते किटचे वितरण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : पिण्याच्या पाण्याची जैविक व रासायनिक तपासणी आता प्रत्येक गावातील पाच महिला एफटीके किटद्वारे गावातच करणार आहेत. पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील महिलांना या करीता प्रशिक्षीत करण्यात येणार आहे. 11 जानेवारी रोजी मोहाडी आणि तुमसर पंचायत समितीस्तरावर महिलांना एफटीके द्वारे पाणी तपासणी प्रात्यक्षिकाचे धडे देण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एम. कुर्तकोटी यांचे हस्ते एफटीके किटचे वितरण करण्यात आले. 

यावेळी प्रकल्प संचालक (जी.ग्रा. वि.यंत्रणा) विवेक बोंदरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) सचिन पानझडे आदि उपस्थित होते. 

किट वितरण कार्यक्रमाप्रसंगी कुर्तकोटी म्हणाले की, जल जीवन मिशनच्या माध्यमातून गावस्तरावर नळ पाणी पुरवठा योजनेद्वारे नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविल्या जात आहे. आरोग्याच्या दृष्टीने पिण्याचे पाणी गुणवत्तापूर्ण असणे महत्वाचे आहे. याकरीता प्रत्येक गावात पाच महिलांच्या सहायाने पिण्याच्या पाण्याची जैविक व रासायनिक तपासणी यापुढे केली जाणार आहे. गावात  तात्पुरत्या स्वरूपात महिलांच्या सहायाने पाणी तपासणी होत असल्याने प्रत्येक कुटूंबियांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत होणार आहे. पाणी हे जीवन असलेले कार्य महिलांच्या हातातून होत असल्याने पाण्याची गुणवत्ता अधिक चांगल्या तऱ्हेने राखली जाणार आहे. याकरीता गावातील महिलांचे सहकार्य मौलाचे ठरणार असल्याचे ते म्हणाले.

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत दरदिवशी प्रती व्यक्ती 55 लिटर प्रमाणे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. पिण्याचे पाणी शुध्द व सुरक्षित असावे याकरीता पाणी गुणवत्तेवर भर देण्यात आला आहे. पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत प्रत्येक गावातील सक्रीय असलेल्या पाच महिलांना जैविक व रासायनिक पाणी तपासणीकरण्याकरीता शिक्षीत केले जात आहे. जिल्हा व उपविभागीयस्तरावर सध्या पाणी तपासणीची सुविधा उलब्ध आहे. मात्र त्या ठिकाणी घेऊन गेलेले पाणी तपासणीकरीता चार दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे आता गावातच महिलांच्या माध्यमातून गुणवत्ता राखण्याकरीता पिण्याच्या पाण्याची जैविक व रासायनिक तपासणी गावातच करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. प्रत्येक गावांना पुरविण्यात आलेल्या एफटिके किटद्वारे महिलांच्या सहायाने पाणी तपासणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. महिलांना शिक्षीत करण्याच्या दृष्टीने पंचायत समितीस्तरावर तपासणी एफटिके किटचे प्रात्यक्षिक उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) डॉ. संघमित्रा कोल्हे यांचे नेतृत्वात दिल्या जात आहे.

जिल्ह्यात स्वच्छ जल से सुरक्षा अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जैविक व रासायनिक पाणी तपासणी बाबत महिला, जलसुरक्षक व सचिवांना प्रात्यक्षिक देण्यात आले. त्यांना गावात करावयाची एफटीके किटची ओळख, तपासणीची पध्दत याबाबत माहिती देऊन प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. यावेळी  पाणी तपासणीबाबत  महिलांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्तकोटी यांचे हस्ते महिलांना एफटीके किटचे वितरण करण्यात आले.





  Print






News - Bhandara




Related Photos