विद्युत प्रवाहाच्या झटक्याने युवकाचा मृत्यू : विद्युत विभागाच्या भोंगळ कारभाराचा बळी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चिमूर :
तालुक्यातील शंकरपूर पासून ५ किमी अंतरावरील वाकर्ला येथील युवक प्रशांत देवराव ढोंगरे (२६) याला खोकर्ला रिठ शिवारात डोमाजी ढवळे यांच्या शेतात विद्युत प्रवाहाचा झटका लागून त्याचा मृत्यू झाला. हि घटना सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. याला विद्युत वितरण कंपनी जबाबदार असल्याच्या चर्चा नागरिकांत असून या बाबत नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. 
या शिवारात विद्युत पोलचे तार हे जमिनीपासून तीन फूट अंतरापर्यंत खाली लोंबकळत असून हे तार शेतमालाला लागलेले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून हे तार असेच लोंबकळत असून याआधीही भैयाजी माळवे यांचे तीन जनावरे याच ठिकाणी विद्युत करंटने दगावले . तसेच याच शेतातील डी.पी. जवळ खुले जिवंत तार विखुरलेले असून डी.पी. मध्ये एकही ग्रीप नाहीत. तर प्रशांत डोंगरे यांचा चौथा बळीही विद्युत वितरण कंपनीने घेतल्याने गावातील नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. 
याबाबत शेतकऱ्यांनी बरेचदा येथील अभियंत्याकडे तक्रारी दिल्या. परंतु गेल्या तीन वर्षांपासून विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळेच हा अपघात झाला असून याला जबाबदार कोण ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाही करून मृत युवकाच्या कुटुंबीयास कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. 
याबाबत समाधीत शाखा अभियंता अमोद रंदये यांना विचारले असता विद्युत साहित्य उपलब्ध नसल्याने व कंत्राटदार यांनी अर्धवट कामे करून सोडल्यामुळे तसेच शासनाकडे वेळोवेळी विद्युत साहित्याची मागणी प्रस्ताव पाठविला असता साहित्य न मिळाल्यामुळे व तार कसणारे मजूर मिळत नसल्यामुळे शेतात जमीन लगत तार पडून आहेत व विद्युत पुरवठा सुरु आहे. आम्ही वेळोवेळी याबाबत जागरूक राहण्याची माहिती देत असतो. त्यामुळेच प्रशांत डोंगरे याचा विद्युत पुरवठा सुरु असतांना मृत्यू झाला. परंतु लवकरच कामात सुधारणा करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येईल. असे शाखा अभियंता रंदये यांनी सांगितले.   Print


News - Chandrapur | Posted : 2018-10-24


Related Photos