महत्वाच्या बातम्या

 गोवर रुबेला लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अमलबजावणीकरीता सिटी टास्क फोर्स समितीची बैठक संपन्न


- १५ ते २६ जानेवारी लसीकरणाचा दुसरा टप्पा 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील संभाव्य गोवर- रुबेला आजार प्रतिबंधासाठी चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य विभागाद्वारे  नियोजनबध्द पावले उचलली जात असून त्यानुसार १५ डिसेंबर ते २५ डिसेंबर २०२२ पर्यंत लसीकरणाचा पहिला टप्पा पार पाडण्यात आला. आता १५ जानेवारी ते २६ जानेवारी २०२३ मध्ये विशेष लसीकरण मोहीमेचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार असुन त्या अनुषंगाने चंद्रपूर महानगरपालिका टास्क फोर्स समितीची बैठक ११ जानेवारी रोजी मनपा स्थायी समिती सभागृहात पार पडली. 

मनपा प्राथमिक केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्यसेविका यांच्या मदतीने १०० टक्के लसीकरण करणे तसेच एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्यास आशा वर्कर द्वारे घरोघरी गोवर रुबेला संबंधी सर्वेक्षण सुरु आहे. शहरातील खाजगी दवाखाने, शाळा तसेच इतरत्र कुठेही ताप तसेच अंगावर पुरळ असलेले संभाव्य रुग्ण आढळल्यास तातडीने मनपा प्राथमिक आरोग्य केंद्रास अथवा परिचारिकांना सूचना करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.  

सध्या महानगरपालिका क्षेत्रात एकही गोवर - रुबेला बाधित रुग्ण नसुन प्रतिबंधाकरिता ९ महिने ते ५ वर्ष वयोगटातील लसीकरण न झालेल्या बालकांचे लसीकरण करण्याकरिता विशेष गोवर रुबेला लसीकरण अभियान शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येणार असून २६ जानेवारी २०२३ पर्यंत या मुलांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवण्यात आले आहे.

या मोहीमेअंतर्गत महानगरपालिका क्षेत्रात लसीकरण सत्रांचे नियोजन करण्यात आले असून बालकांना पहिला डोस व दुसरा डोस कश्या प्रकारे देण्यात येईल, याबाबत टास्क फोर्सच्या बैठकीत कृती आराखडा सादर करण्यात आला. सदर विशेष गोवर रुबेला लसीकरण मोहीमेची व्यापक प्रसिध्दी विविध माध्यमांतून करण्याचे टास्क फोर्स सदस्यांमार्फत सूचित करण्यात आले असून त्यानुसार आरोग्य विभागामार्फत प्रचार प्रसिध्दी केली जात आहे. तरी 9 महिने ते 5 वर्षे वयोगटातील बालकांचे त्यांच्या पालकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने कऱण्यात येत आहे.

याप्रसंगी मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, सर्व्हेलन्स मेडीकल ऑफीसर डॉ.मोहम्मद साजीद, डॉ.भुपेंद्र लोढीया, डॉ.जितेंद्र खोब्रागडे, इंडियन पीडिऑट्रिक असोसिएशनचे सचिव डॉ.व्यंकट पंगा व क्षयरोग वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल साठे, रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचे ज्ञानेश कंचर्लावार, अजय जयस्वाल, अरुण तिखे तसेच मनपा प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थीत होते. 





  Print






News - Chandrapur




Related Photos