महत्वाच्या बातम्या

 आजचा युवावर्ग आणि राष्ट्राभिमान


प्रस्तावना : भारत हा प्रचंड मोठी युवाशक्ती असलेला देश आहे. एका आकडेवारीनुसार देशाची 22 टक्के लोकसंख्या ही 18 ते 29 या वयोगटातील आहे. हाच युवावर्ग या देशाचा आधारस्तंभ आहे. हा आधारस्तंभ जेवढा भक्कम आणि राष्ट्रनिष्ठ असेल, तेवढे राष्ट्र प्रगतीपथावर जाईल. फ्रेंच राज्यक्रांतीचे प्रणेते रूसो यांनी तुमच्या देशातील युवकांच्या ओठांवर कोणती गाणी आहेत ?, ते मला सांगा, मी तुमच्या देशाचे भवितव्य सांगतो, असे उद्गार काढले होते. रूसो यांचे विधान कोणत्याही कसोटीवर पडताळून पाहिल्यास त्याची सत्यता पटते. या कसोटीला देश, काल, स्थिती आदी कशाचेही बंधन नाही. भारताच्या संदर्भात सांगायचे झाले, तर गेल्या काही वर्षांमध्ये युवावर्गामध्ये राष्ट्रप्रेमाची ज्योत प्रज्वलित होत असल्याचे दिसत असले, तरी तिचे राष्ट्रभक्तीच्या धगधगत्या ज्वालेत रूपांतर होण्यासाठी अद्यापही भगीरथ प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. 

अ. भारताच्या तेजस्वी युवाशक्तीचा इतिहास : भारताला तेजस्वी युवाशक्तीचा प्रदीर्घ इतिहास आहे. आदि शंकाराचार्यांनी वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी आत्मज्ञान प्राप्त केले आणि त्यांचे जीवन हिंदु धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी समर्पित केले. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी ज्ञानेश्‍वर महाराजांनी ज्ञानेश्‍वरी हा महान ग्रंथ लिहून समाजाला दिशा दिली. छत्रपती शिवरायांनी वयाच्या 16 व्या वर्षी रायरेश्‍वराच्या मंदिरात त्यांच्या सवंगड्यांसह हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची प्रतिज्ञा केली. वयाच्या केवळ 30 व्या वर्षी स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील धर्मपरिषदेत ऐतिहासिक भाषण करून हिंदु धर्माची पताका जगभर फडकवली. बाजीराव पेशवे यांनी त्यांच्या उण्यापुर्‍या 39 वर्षांच्या कार्यकाळात मराठा साम्राज्याचा विस्तार करत अटकेपार झेंडे फडकावले. अगदी अलीकडच्या काळात, म्हणजे साधारण शे-पाऊणशे वर्षांपूर्वी नुकतेच मिसरूड फुटलेले कोवळे तरुण भारताच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर चढले. धर्म आणि राष्ट्र यांच्या उत्थानासाठी अवघे जीवन समर्पित करणार्‍या अशा तेजस्वी युवकांची कित्येक उदाहरणे देता येतील. आज या तेजस्वी युवाशक्तीच्या परंपरेचा ओघ आटला आहे, हे निश्‍चित ! आज विलक्षण राष्ट्र्रप्रेम आणि धर्मनिष्ठा असणारे युवक देशात आहेत; पण त्यांची संख्या मोजकी आहे. भारताच्या युवावर्गाचे एकंदरित सर्वसाधारण चित्र पाहिले, तर ते अधिक अर्थकेंद्रित झालेले दिसून येते. हे केंद्र अर्थवरून राष्ट्राकडे सरकले, तर देशाच्या उन्नतीला वेळ लागणार नाही. 

आ. सध्याची विदारक स्थिती : आजचा सर्वसाधारण भारतीय युवक हिंसक आणि अश्‍लील मालिका, चित्रपट, व्यसने, हीन अभिरुचीचे साहित्य, पुढारलेपणाच्या भ्रामक कल्पना यांमुळे भरकटला आहे. मोठ्या रकमेचे ‘पॅकेज’, गाडी-बंगला या भौतिक सुखसोयींनाच आयुष्याचे ध्येय मानल्यामुळे तरुणांमध्ये आत्मकेंद्रितपणा वाढत आहे. असे स्वार्थी युवक जिथे जन्मदात्या माता-पित्यांनाही वृद्धाश्रमात ठेवायला मागे-पुढे पहात नाही, तिथे ते राष्ट्रासाठी काही योगदान देतील, याची अपेक्षा ठेवणे चुकीचे होईल. व्यसनी चित्रपट अभिनेत्यांवर झालेल्या कारवाईमुळे तळमळणारे, चित्रपट कलाकारांच्या व्यक्तिगत आयुष्यातील घटनांच्या वाचनात रस दाखवणारे, ‘टेक्नोसॅव्ही’च्या नावाखाली भ्रमणभाष, दूरचित्रवाणी, संगणक यांमध्ये खितपत पडणारे, अडचणीत सापडलेल्याला साहाय्य करण्याऐवजी त्याच्या असाहाय्यतेचे चित्रीकरण करण्यात मग्न असणारे युवक राष्ट्रउभारणीमध्ये योगदान देऊ शकत नाहीत.
आजही अनेक युवक भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रीयगीत यांविषयी संभ्रमित होतात. आजही कित्येक जणांना संपूर्ण वन्दे मातरम् म्हणता येत नाही. गोव्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या केलेल्या एका सर्वेक्षणाच्या वेळी विद्यार्थ्यांकडून भारताचे राष्ट्रगीत म्हणून ‘हम होंगे कामयाब’, ए मेरे वतन के लोगो अशा प्रकारची उत्तरे मिळाली होती. पोदार इन्स्टिट्यूट ऑफ एज्युुकेशन या संस्थेने केलेल्या सर्व्हेक्षणामध्ये मुंबई, बेंगळुरु, चेन्नई येथील 40 टक्के विद्यार्थीही योग्य प्रकारे राष्ट्रगीत म्हणू शकत नसल्याने आढळून आले होते. राष्ट्रीय प्रतीकांविषयी उदासीनता असेल, तर राष्ट्रप्रेमाविषयी प्रश्न पडतो.
स्वामी विवेकानंद यांनी एके ठिकाणी म्हटले होते, आजच्या युवकांना देशाला कसे वळण लावावे, याऐवजी केसाला कसे वळण लावावे ?, याची चिंता अधिक आहे. देशाने मला काय दिले ?, यापेक्षा मी देशाला काय देऊ शकतो ?, याचा विचार केला पाहिजे.

इ. राष्ट्रभक्तीचा प्रवाह क्षीण होण्याची कारणे : स्वातंत्र्यपूर्व काळात देशप्रेमाने भारित झालेल्या युवापिढीतील देशप्रेमाची भावना स्वातंत्र्योत्तर काळात क्षीण होण्यामागे अनेक कारणे आहेत. मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धत हे त्यामागील प्रमुख कारण आहे. विद्यापिठातून पदव्यांचे कागद घेऊन बाहेर पडणार्‍या युवकांना आज नोकरीसाठी भटकावे लागत आहे. सखोल ज्ञान मिळवण्यापेक्षा जुजबी ज्ञानावर पदवीधर झालेला युवक व्यवहारी अन् वास्तववादी जगात कुचकामी ठरत आहे, ही वस्तूस्थिती आहे. फ्रेंच राज्यक्रांती कशी झाली ?, दुसरे महायुद्ध कसे झाले ?, याचा इतिहास आज शैक्षणिक अभ्यासक्रमांतून शिकविला जातो; मात्र पेशव्यांनी अटकेपार झेंडे कसे फडकवले ?,1857 चे स्वातंत्र्यसमर कसे घडले ?, विजयनगरचे साम्राज्य कसे उभे राहिले ?, भारताची प्राचीन प्रगल्भ संस्कृती कशी होती ?, विज्ञान-तंत्रज्ञानात भारत किती अग्रेसर होता ?, भारताचा सकल राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा तब्बल 30 टक्क्यांपर्यंत कसा पोचला होता ?, याविषयी युवावर्गाला अनभिज्ञ ठेवल्यामुळेच त्यांच्यामध्ये देशप्रेम निर्माण होण्यात अडथळा निर्माण झाला आहे. भारताची जी जी गौरवस्थाने आहेत, ती ती विकृत इतिहास थोपवून न्यूनगंडांची केंद्रे बनवण्यात आली, तर त्यांच्यामध्ये देशप्रेम निर्माण होणार कुठून ? जो समाज आपला इतिहास विसरतो, तो उज्ज्वल भविष्य निर्माण करू शकत नाही. केवळ शैक्षणिक अभ्यासक्रम नाही, प्रसारमाध्यमेही या स्थितीसाठी उत्तरदायी आहेत. पाक्षिक आर्यनीतीचे संपादक श्री. सत्यव्रत सामवेदी यांनी म्हटले होते की, प्रसारमाध्यमे देशातील युवाशक्तीला देशभक्तीची प्रेरणा देण्यास अपयशी ठरणे, हे राष्ट्राच्या पतनाचे एक महत्त्वपूर्ण कारण आहे ! आज युवावर्गाला चित्रपट अभिनेत्यांची नावे आणि त्यांचे वाढदिवस तोंडपाठ असतात; मात्र क्रांतीकारकांची नावे आणि त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथी ठाऊक नसतात. ही परिस्थिती पालटेल, तेव्हा देशाचा खरा विकास होईल. 

ई. राष्ट्रभक्तीच्या अभावाचे दुष्परिणाम : राष्ट्रभक्तीच्या अभावामुळे आज राष्ट्र प्रथमच्या ऐवजी ‘स्वार्थ प्रथम’ हे समीकरण झाले आहे. अर्थार्जनासाठी अनेक बुद्धीवान तरुण विदेशाची वाट धरतात. तथाकथित समाजहिताच्या नावाखाली केल्या जाणार्‍या आंदोलनांमध्ये दगडफेक, जाळपोळ करून, रस्ते अडवून युवक राष्ट्रीय संपत्तीची हानी करतात. अनेक जण थेट कायदा हातात घेतात. युवकांंच्या भावनांशी खेळून राजकीय पक्षांकडून त्यांचा वापर करून घेतला जात आहे, हेही त्यांच्या लक्षात येत नाही. ज्याप्रमाणे वाळवी लागलेल्या लाकडामुळे घराचे वासे ठिसूळ होऊन ते स्वतःसह घरालाच भुईसपाट करतात, त्याचप्रमाणे तरुण पिढी स्वतःसह देशाच्या विनाशाला कारणीभूत ठरत असल्याचे चित्र दिसत आहे .आज युवा पिढीला जागृत करून सन्मार्गाला लावून युवा शक्तीचा होणारा र्‍हास थांबवण्याची आवश्यकता आहे. 

उ. राष्ट्रभक्ती कशी निर्माण करायची ? : राष्ट्रप्रेम दाखवण्यासाठी प्रत्येकाने सीमेवर जाऊन लढायला हवे, असे नाही; पण अनेक साध्या-सोप्या कृतींचे अनुसरण करूनही स्वतःवर राष्ट्रप्रेमाचा संस्कार निर्माण करता येऊ शकतो. राष्ट्रप्रेम वाढवण्यासाठी स्वभाषा आणि स्वसंस्कृती यांचा अभिमान जोपासायला हवा. हा अभिमान निर्माण होण्यासाठी स्वभाषा आणि संस्कृती यांचा अभ्यास करण्याची, त्यांची वैशिष्ट्ये जाणून घेण्याची आवश्यकता आहे. क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांच्या चरित्रांचे पारायण करण्यातून राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित होऊ शकते. 15 ऑगस्ट- 26 जानेवारी या दिवशी कागदी झेंडे गाड्यांवर मिरवण्यापेक्षा तोे वेळ राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी वापरला आणि इतरांचेही त्याविषयी प्रबोधन केले, तर तीही देशसेवाच आहे. रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज उचलून स्थानिक प्रशासनाकडे जमा केले, तिरंग्याच्या रंगातील केक न कापण्याविषयी, तिरंग्याच्या रंगाचे कपडे किंवा मास्क न वापरण्याविषयी इतरांचे प्रबोधन केले, तर त्यातून राष्ट्रीय अस्मितांचा अनादर रोखण्याच्या कार्यात हातभार लागू शकतो.
आज पुढारलेपणाच्या किंवा धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भारतविरोधी विचार प्रसारित केले जात आहे. अशा राष्ट्रविरोधी विचारांचे वैचारिक खंडण करण्याची आज आवश्यकता आहे. कायद्यांचे पालन करणे, सिग्नल पाळणे, आपले काम प्रामाणिकपणे आणि चोख बजावणे, अन्यायाविरुद्ध वैध मार्गाने लढा देणे, पूर्वजांनी मिळवून दिलेल्या स्वातंत्र्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी प्रयत्न करणे, हीही देशसेवाच आहे. क्रिकेटच्या सामन्यात भारत जिंकल्यानंतर फटाके वाजवणे,15 ऑगस्ट- 26 जानेवारीच्या दिवशी राष्ट्रभक्तीपर गाण्याची ‘रिंगटोन’ ठेवणे हे खरे राष्ट्र्रप्रेम नव्हे, तर देशासाठी त्याग करण्याची सिद्धता असणे, सुव्यवस्था निर्माण होण्यासाठी प्रयत्नरत असणे, आपली बुद्धी-आपले कौशल्य यांचा विनियोग राष्ट्रोद्धारासाठी करणे, ही खरी राष्ट्रभक्ती आहे. धर्म हा राष्ट्राचा प्राण आहे. त्यामुळे आपल्या राष्ट्रभक्तीला साधनेची अर्थात् उपासनेचीही जोड आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांनीही राष्ट्रोत्थानाचे कार्य करतांना अखंड साधनाही केली होती. त्याप्रमाणे जर युवकांनी सनातन धर्माचे अनुसरण, तसेच साधना केली, तर त्यांचा व्यक्तिगत आत्मिक विकासही साध्य होईल. त्यांच्याकडून होणार्‍या कार्याची फलनिष्पत्तीही वाढेल. युवकांची उन्नती झाली, तरच पर्यायाने समाजाची म्हणजे राष्ट्राची उन्नती होईल. 

संकलक : श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था 
स्थानिक संपर्क : 7038713883





  Print






News - Editorial




Related Photos