शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ तत्काळ मिळवून द्या : खा. अशोक नेते


- सिरोंचा येथे जनता तक्रार दरबार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा :
महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ केले आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. अनेक शेतकऱ्यांच्या अर्जांमध्ये त्रुट्या दाखवून सबंधित विभागाकडून कर्जमाफी देण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे. अधिकाऱ्यांनी याची दखल घेवून शेतकऱ्यांच्या अर्जातील त्रुट्या दूर करून शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशा सुचना खा. अशोक नेते यांनी सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
सिरोंचा नगर पंचायतमध्ये काल २२ आॅक्टोबर रोजी आयोजित जनता तक्रार दरबारात अधिकाऱ्यांना सुचना देताना खा. नेते बोलत होते. केंद्र व राज्य शासनाच्या कार्याचा आढावा घेवून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी काल २३ आॅक्टोबर रोजी सिरोंचा येथे जनता तक्रार दरबार आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लोकसभा विस्तारक तथा भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव कोहळे, जिल्हा महामंत्री रविंद्र ओल्लालवार, डाॅ. भारत खटी, राज्य परिषद सदस्य सत्यनारायण मंचार्लावार, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष प्रकाश गेडाम, गडचिरोली विधानसभा विस्तारक दामोधर अरगेला, जिल्हा सचिव विनोद आकनपल्लीवार, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा महामंत्री रियाजभाई शेख, अल्पसंख्यांक आघाीचे डेवीड बोगी, सिरोंचा नगर पंचायतीच्या बांधकाम सभापती सिमाताई मासर्ला, सिरोंचा शहर अध्यक्ष संदिप राचर्लावार, माधव कासर्लावार, उपसरपंच रंगु बापू, कुळमेथे, महिला आघाडी जिल्हा महामंत्री मालुताई तोडसाम, मधुसुधन आरवेली, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. कन्नाके आदी उपस्थित होते.
जनता तक्रार दरबारमध्ये आढावा घेताना खा. अशोक नेते यांनी १२ विभागाचे विभागप्रमुख, अधिकारी गैरहजर असल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची सुचना तहसीलदारांना दिली. यावेळी २ वर्षांपूर्वी डिमांड भरूनही विद्युत जनित्र लावण्यात आले नाही. जळालेले विद्युत जनित्र बदलविण्यात आले नाही. तसेच एक एकर शेतीचे दहा हजार रूपये अवास्तव देयक पाठविण्यात आले असून रंगधामपेठा येथील लाईनमॅन अशोक बोधनवार हे नियमित गैरहजर राहत असल्याची बाब नागरिकांनी खा. नेते यांच्यासमोर मांडली. लाईनमॅन बोधनवार यांची तत्काळ बदली करण्याची मागणी केली. खा. अशोक नेते यांनी तत्काळ महावितरणचे अधीक्षक अभियंता बोरसे यांना दुरध्वनी वरून सुचना करून समस्या सोडविण्याच्या सुचना दिल्या. अंकीसा माल येथे अतिवृष्टीने शेतजमीन खरडून गेल्याने ५६७ हेक्टरचे नुकसान झाल्याने शेतजमिनीचे सर्व्हेक्षण करून तत्काळ मोबदला देण्याच्या सुचना खा. नेते यांनी केल्या. सिरोंचा परिसरात धानपिक व कापसाची शेती मोठ्या प्रमाणात असल्याने धान खरेदी व कापूस खरेदी केंद्र सिरोंचा येथे सुरू करून शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर शेतमाल विक्रीची सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगितले.
वर्ग २ च्या जमीनी वर्ग एक मध्ये करण्याची प्रकरणे प्रलंबित असून उर्वरीत ८५ गावांमधील जमिनी एका महिन्यात वर्ग १ करून द्याव्यात., प्रलंबित शौचालय व घरकुलाची कामे तत्काळ पूर्ण करून नागरिकांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून द्यावा, सर्व बॅंकांनी जास्तीत जास्त युवकांना पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेचा लाभ देवून त्यांना रोजगार उभा करण्यास सहकार्य करावे, असे खा. अशोक नेते म्हणाले.
यावेळी तहसीलदारांनी अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झालेल्या नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी १३ लाख रूपयांची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असल्याचे सांगितले. यावेळी खा. अशोक नेते यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. सिरोंचा येथे शौचालय व घरकूल बांधकामासाठी रेती मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी पस्थित केल्या. तसेच तहसीलदार रेती आणण्याची परवानगी देत नसून सिरोंचात २ कोटी ४० लाखांची कामे ठप्प पडली आहेत असे सांगितले. यामुळे खा. नेते यांनी शौचालय तसेच घरकूल बांधकामासाठी एखाद्या रेती घाटातून रेती पलब्ध करून देण्याच्या सुचना केल्या. शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभ देवून सिरोंचा येथे बसस्थानक निर्माण करण्यासाठी पाठपुरावा करावा, असरअल्ली येथील ३३ केव्ही विद्युत उपकेंद्र त्वरीत सुरू करण्यात यावे, अशा सुचना सबंधितांना केल्या. जनता तक्रार दरबाराला तालुक्यातील विविध गावातील नागरिक उपस्थित होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-23


Related Photos