रानडुकराच्या शिकारीसाठी लावलेल्या सापळ्यात अडकला पट्टेदार वाघ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जंगलात रानडुकराची शिकार करण्यासाठी काही लोकांनी लावून ठेवलेल्या सापळ्यात चक्क एक पट्टेदार वाघ अडकल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी उघडकीस आला. ही बाब वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळताच त्या वाघाची सापळ्यातून मुक्तता करण्यासाठी नागझिरा आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून शार्प शुटरला पाचारण करण्यात आले आहे. कुरखेडा या तालुका मुख्यालयापासून ३० किलोमीटरवर मालेवाडाजवळच्या कातलवाडा गावानजीकच्या जंगलात हा प्रकार घडला आहे. परिसरातील जंगलात रानडुकराची शिकार करून त्याची अवैधपणे विक्री करण्याचा प्रकार अधूनमधून सुरू असतो. त्यासाठी वनकर्मचाऱ्यांची नजर चुकवून शिकारीसाठी सापळे लावले जातात. मात्र यावेळी पहिल्यांदाच त्या सापळ्यात एक वाघ अडकल्याचे लक्षात आहे. ही माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.
देसाईगंज वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सहायक वनसंरक्षक मनोज चव्हाण यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. दरम्यान, त्या वाघाला सापळ्यातून मुक्त करण्यासाठी बेशुद्ध करणे आवश्यक असल्याचे लक्षात येताच वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी बेशुद्धीचे इंजेक्शन देणाऱ्या शार्प शुटरला पाचारण केले.
वाघाची सापळ्यातून सुटका करण्यासाठी त्याला आधी बेशुद्ध करणे गरजेचे आहे. त्यामुळे नागझिरा आणि ताडोबा येथील शार्प शुटरला बोलावले आहे. ते पोहोचल्यानंतर रात्रीच त्याला बेशुद्ध करून सापळ्यातून मुक्त केले जाईल.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2021-12-01
Related Photos