गडचिरोली वाहतूक शाखेची अल्पवयीन दुचाकीस्वारांवर धडक कारवाई


- अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या  हातात दुचाकी
- पालकांनी लक्ष देण्याची गरज
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
शहरात शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या हातात पालकांनी दुचाकी दिली आहे. हे विद्यार्थी शाळा, महाविद्यालय तसेच शिकवणी वर्गासाठी जातांना भरधाव वेगाने दुचाकीने जातात. कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना शहरातील मार्गांवरून दिवसभर हे अल्पवयीन दुचाकीस्वार हुंदडत असतात. यामुळे वाहतूक शाखेने गर्दीच्या रस्त्यांवर अल्पवयीन दुचाकीस्वारांविरूध्द मोहिम सुरू केली आहे. आज २२ आॅक्टोबर रोजी शिवाजी महाविद्यालय ते रेड्डी गोडावून कडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक शाखेने अल्पवयीन दुचाकीस्वारांवर कारवाई केली आहे.
गडचिरोलीत अल्पवयीन दुचाकीस्वार भरधाव वेगाने वाहने चालवितांना दिसून येतात. गर्दीच्या ठिकाणीही स्टंटबाजी करीत हे दुचाकीस्वार नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. अर्थात याला या दुचाकीस्वारांचे पालकही तितकेच जबाबदार आहेत. शहरात गल्लीबोळात शिकवणी वर्ग भरविले जातात. यामुळे सकाळी आणि सायंकाळी शिकवणी वर्गाला जाताना तसेच शाळा, महाविद्यालयात जातांना हे विद्यार्थी दुचाकीनेच जातात. काही मोजकेच   विद्यार्थी सायकलने जातात. शिकवणी वर्गाला जाताना अनेकदा टोळी - टोळीने दुचाकी जवळ जवळ घेवून जातांना हे विद्यार्थी आढळून येतात. अशा दुचाकीस्वारांवर कारवाई करावी, अशी मागणी अनेक सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे. शहरात दुचाकीस्वारांच्या अपघातांमध्ये सुध्दा वाढ झाली आहे. नुकतेच चंद्रपूर मार्गावर एका विद्यार्थीनीने दुचाकीने जाताना प्राण गमावला. तसेच काही महिन्यांपूर्वी गडचिरोली मार्गावरसुध्दा एका विद्यार्थिनीने दुचाकीच्या अपघातात जीव गमावला आहे. 
वाहतूक शाखेच्या वतीने तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने अनेकदा शाळा, महाविद्यालयांमध्ये मोहिम राबवून अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या हातात दुचाकी न देण्याबाबत जनजागृती केली जाते. मात्र मुलांच्या हट्टामुळे म्हणा किंवा घरी वाहने उपलब्ध असल्याने म्हणा पालक पाल्यांच्या हातात दुचाकी वाहने देत आहेत. या अल्पवयीन मुलांकडे दुचाकी चालविण्याचा कोणताही परवाना नाही. यामुळे वाहतूक पोलिस शाखेच्या वतीने शहरात विविध परिसरात कारवाईस प्रारंभ केला आहे. आज २२ आॅक्टोबर रोजी केलेल्या कारवाईमुळे या अल्पवयीन दुचाकीस्वारांची चांगलीच धांदल उडाली होती. अनेक मुला - मुलींच्या पालकांना बोलावून वाहने चालान करण्यात आली. या कारवाईमुळे सुज्ञ नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-22


Related Photos