कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे शहर धोक्यात : नागरिकांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील गणेश नगर परिसरात रविवारी दुपारी कचऱ्याला लागलेल्या भीषण आगीमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. तीव्र उष्णता आणि जोरदार वाऱ्यामुळे आग वेगाने पसरत शहराच्या दिशेने सरकत होती. मात्र स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे संभाव्य मोठे नुकसान टळले.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश नगर परिसरातील मोकळ्या जागेत साचलेल्या कचऱ्याला दुपारी सुमारे १२ वाजल्यानंतर कुणीतरी आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणी प्लास्टिक, कापड, जैविक कचरा तसेच इतर ज्वलनशील वस्तू मोठ्या प्रमाणात टाकल्या जात असल्याने आग झपाट्याने भडकली. उष्णतेची लाट आणि वाऱ्याचा वेग यामुळे आगीने विक्राळ रूप धारण केले.
आग वाढत असल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ स्वतःच्या घरातील पाण्याचा वापर करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. काही वेळाने घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. जवळपास तासभराच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले.
स्थानिकांच्या मते, अग्निशमन दल घटनास्थळी आणखी उशिरा पोहोचले असते तर आग गणेश नगर, वरोरा नाका, पत्रकार संघ कार्यालय परिसर तसेच नागपूर रोडलगतच्या भागात पसरून मोठे नुकसान होण्याची शक्यता होती. त्यामुळे शहरातील एक मोठा भाग संभाव्य आगीच्या संकटातून बचावला.
दरम्यान, पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी शहरातील विविध भागांत मोकळ्या जागांमध्ये कचरा टाकण्याच्या वाढत्या समस्येकडे लक्ष वेधले आहे. आगामी आठवडाभर तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता महानगरपालिका प्रशासनाने प्रत्येक प्रभागातील कचरा तातडीने हटवून आग प्रतिबंधक उपाययोजना राबवाव्यात, तसेच नागरिकांनीही कचरा जाळण्याचे प्रकार टाळावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
कचरा व्यवस्थापनातील निष्काळजीपणा आणि उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये आग लागण्याचा धोका वाढत असल्याने प्रशासनाने त्वरित प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
News - Chandrapur




Petrol Price




