नवतपाला उद्यापासून सुरुवात : पुढील नऊ दिवस मध्य भारतात उष्णतेचा कहर

- तापमान उच्चांक गाठण्याची शक्यता; मान्सूनच्या आगमनासाठी महत्त्वाचा मानला जातो कालावधी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : मध्य भारतातील सर्वाधिक उष्णतेचे दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवतपा कालावधीला सोमवार २५ मे पासून सुरुवात झाली असून हा कालावधी २ जूनपर्यंत राहणार आहे. या नऊ दिवसांत विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातसह मध्य भारतातील अनेक भागांत तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता असून उष्णतेच्या लाटांचा प्रभावही तीव्र राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान आणि खगोलशास्त्रीय अभ्यासानुसार सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करताच नवतपाचा कालावधी सुरू होतो. भारतीय परंपरेत या कालखंडाला विशेष महत्त्व असून, प्राचीन काळापासून सूर्याच्या भ्रमणमार्गाचा, ऋतूंच्या बदलांचा तसेच तापमान आणि पर्जन्यमानाच्या चक्राचा अभ्यास करण्यात आला आहे. त्या निरीक्षणांच्या आधारे नवतपा हा वर्षातील सर्वाधिक उष्णतेचा कालावधी मानला जातो.
तज्ज्ञांच्या मते, एप्रिल ते जून या कालावधीत सूर्याची किरणे मध्य भारतातील भूभागावर जवळपास लंबवत पडतात. त्यामुळे जमिनीचे तापमान झपाट्याने वाढते. त्याचवेळी राजस्थान आणि गुजरातच्या वाळवंटी भागांतून येणारे उष्ण वारे विदर्भ आणि मध्य भारताकडे वाहू लागतात. परिणामी उष्णतेच्या लाटा निर्माण होऊन तापमानात लक्षणीय वाढ होते.
मागील अनेक वर्षांच्या हवामान नोंदींनुसार नवतपाच्या काळातच सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. काही भागांत तापमान ४८ ते ४९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे या काळात नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज असल्याचे हवामान अभ्यासकांचे मत आहे.
नवतपा आणि मान्सून यांचा संबंधही महत्त्वाचा मानला जातो. जमिनीचे तापमान अधिक वाढल्यास कमी दाबाचा पट्टा अधिक प्रभावी बनतो आणि मान्सूनच्या वाऱ्यांना चालना मिळते. त्यामुळे नवतपा चांगला तापल्यास मान्सूनचा पाऊसही समाधानकारक होण्याची शक्यता वाढते, असे हवामानशास्त्रीय निरीक्षण आहे.
दरम्यान, हवामान बदलामुळे आगामी काळात उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होण्याचा इशारा विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हवामान संशोधन संस्थांनी दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे, हलका आहार घेणे आणि उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
हवामान अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या नवतपाच्या काळातही विदर्भासह मध्य भारतात तापमानाचा पारा चांगलाच चढण्याची शक्यता असून नागरिकांनी उष्णतेबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




