महत्वाच्या बातम्या

 शिकाऊ परवाना काढण्यासाठी बसवला डमी उमेदवार : नेटकॅफे चालकावर गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : फेसलेस सेवेद्वारे आधारकार्डची नोंदणी करून संगणकाद्वारे किंवा नेट कॅफेमध्ये परीक्षा देऊन घरबसल्या शिकाऊ अनुज्ञप्ती काढण्याची सुविधा परिवहन विभागाने उपलब्ध करून दिली आहे. मात्र, नेट कॅफे संचालक या पद्धतीचा गैरवापर करीत उमेदवारांच्या जागी डमी उमेदवार बसवून शिकाऊ परवाना काढून दिल्याचा प्रकार ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी येथे उघडकीस आला आहे. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या तक्रारीवरून नेट कॅफे संचालक संजू बनसोडे, रा. गांगलवाडी तालुका ब्रह्मपुरी याच्यावर ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनमध्ये कलम ४२०, ४६५, ४६८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रादेशिक विभागाने आता बहुतांश सेवा फेसलेस केल्या आहेत. शिकाऊ वाहन परवाना काढणेसुद्धा फेसलेस केले आहे. त्यामुळे आता शिकाऊ परवाना काढण्यासाठी आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही. केवळ आधार नंबरवरची नोंद करून पेपर देऊन परवाना काढता येतो. गांगलवाडी येथील करिअर इन्स्टिट्यूट येथे शाहरुख युसूफ पठाण (२७) हा शिकाऊ परवाना काढण्यासाठी गेला.

दरम्यान, नेट कॅफे चालकाने त्याच्याकडून ८५० रुपये घेत डमी उमेदवार बसवून त्याला शिकाऊ परवाना काढून दिला. मात्र, पर्मानंट परवाना काढण्यासाठी गेल्यानंतर त्याला कोणत्याच चिन्हाची व नियमाबाबत माहिती नसल्याचे सहायक मोटार वाहन निरीक्षक नरेंद्रकुमार गोवर्धन उमाळे यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या उमेदवाराची कसून चौकशी केली. करिअर इन्स्टिट्यूट येथे फेसलेस सेवेचा गैरवापर करीत डमी उमेदवार बसवून शिकाऊ परवाना काढून दिल्याचे समोर येताच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्या नेतृत्वात ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली. त्याआधारावर त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

घरबसल्या शिकावू अनुज्ञप्ती योजना शासनाने सुरू केली आहे. यामध्ये उमेदवाराने स्वत: परीक्षा देणे अपेक्षित आहे. संगणकीय प्रणालीवर प्रोक्टोरिंग प्रणाली असल्याने डमी उमेदवार परीक्षा देत असल्यास त्याची नोंद संगणकावर होते. त्यामुळे फसवणूक केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होतो, तसेच कायमस्वरूपी परवाना काढण्यावर बंदी घालण्यात येते.

-किरण मोरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर

शिकाऊ परवाना उमेदवार घरी किंवा नेट कॅफेमध्ये काढत असेल तरीही तो प्रोक्टोरिंग प्रणालीच्या नजरेत असतो. यावेळी डमी उमेदवार आढळल्यास किंवा एकापेक्षा अधिक जण आढळून आल्यास उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे तो परवाना प्रलंबित असतो. चौकशीनंतर त्याच्यावर कारवाई केली जाते.





  Print






News - Chandrapur




Related Photos