'माझे कुटुंब माझी जबाबदारी' हा देशातील अभिनव उपक्रम : राज्यपालांकडून ठाकरे सरकारचे कौतुक


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात करण्यात आली. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोना योद्ध्यांना अभिवादन करत आपल्या भाषणाला सुरूवात केली. "माझे कुटुंब, माझी जबाबदारी हा देशातील अभिनव उपक्रम ठरला आहे. कोरोनाविरोधातील लढाऊ सुरू असून राज्य सरकारनं आता मी जबाबदार योजना सुरू केली आहे," असं म्हणत राज्यपालांनी राज्य सरकारचं कौतुक केलं.
"धारावीसारख्या दाटीवाटीच्या परिसरात राज्य शासनानं प्रभावीपणे काम केलं. राज्य सरकारनं कोरोनासंबंधी मदतीसाठी टास्क फोर्स स्थापन केलं. आरोग्य सुविधांमध्येही आता वाढ करण्यात आली आहे. कोरोनाच्या चाचण्यांसाठी प्रयोग शाळांची संख्याही वाढवण्यात आली आहे," अशी माहिती राज्यपालांनी यावेळी दिली. कोरोना संदर्भात उपाययोजना वाढवण्याची आणि दुसऱ्या लाटेच्या शक्यतेवरून आपल्याला अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले.
"औद्योगिक मंदी असतानाही राज्य सरकारनं चांगलं काम केले आहे. रोजगार मिळणं सुलभ व्हावे यासाठी सरकारनं महारोजगार आणि महाजॉब्ज या पोर्टलची सुरूवात केली. आर्थिक अडचण असतानाही राज्य सरकारं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे अंगणवाड्यांमध्ये न येऊ शकणाऱ्या मुलांना आणि गर्भवती मातांना घरपोच शिधा पोहोचवण्यात आला. शाळा बंद परंतु शिक्षण सुरू हा उपक्रमदेखील राबवण्यात आला," असं राज्यपाल आपल्या अभिभाषणादरम्यान म्हणाले.
"माझं शासन कर्नाटक महाराष्ट्र वादाबद्दल सर्वोच्च न्यायालयात ठाम भूमिका मांडत आहे. मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी काम करत आहे," असंही राज्यपाल कोश्यारी यावेळी म्हणाले.
  Print


News - Rajy | Posted : 2021-03-01


Related Photos