महत्वाच्या बातम्या

 महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ अडकला एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / हिंगणा : विजेचे नवीन मीटर लावून देण्यासाठी विद्युत ग्राहकाकडून ७ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महावितरण कंपनीच्या वरिष्ठ तंत्रज्ञास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई वानाडाेंगरी (ता. हिंगणा) येथे मंगळवारी (दि. ११) दुपारी करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार विशाल भीमराव पावडे (४०) असे अटक करण्यात आलेल्या लाचखाेर कर्मचाऱ्याचे नाव आहे. वानाडोंगरी येथील एका ग्राहकाकडे जास्त दाबाचा वीजपुरवठा सुरू होता. त्यामुळे त्याने महावितरण कंपनीच्या वानाडाेंगरी येथील कार्यालयात तक्रार नाेंदवून मीटर बदलवून देण्याची विनंती केली. विशाल पावडे याने या कामासाठी ७ हजार ५०० रुपयांची मागणी केली. त्यामुळे ग्राहकाने साेमवारी (दि. १०) एसीबीच्या नागपूर शहरातील कार्यालयात तक्रार नाेंदविली.

तक्रार प्राप्त हाेताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रकरणाची लगेच पडताळणी केली. ठरल्याप्रमाणे ग्राहकाने विशाल पावडे याला ७,५०० रुपये देण्याचे मान्य केले आणि ती रक्कम देण्यासाठी मंगळवारी दुपारी त्याच्या कार्यालयात गेले. विशाल पावडे याने लाच स्वीकारताच परिसरातील एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेत शासकीय पंचासमक्ष पंचनामा करून अटक केली. शिवाय, त्याच्याकडून ती रक्कम जप्त केली.

ही कारवाई एसीबीचे पाेलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक मधुकर गीते यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक योगिता चाफले, पोलीस निरीक्षक वर्षा मते व आशीष चौधरी, पाेलीस कर्मचारी अस्मिता मल्लेलवार, अमोल मेंघरे, अनिल बहिरे, हर्षलता भरडकर यांच्या पथकाने केली.





  Print






News - Nagpur




Related Photos