महत्वाच्या बातम्या

 महाराष्ट्र केसरी स्पर्धेला उद्यापासून सुरुवात


- मैदान मारणाऱ्या पैलवानांना मिळणार लाखोंची बक्षीस

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : महाराष्ट्राला कुस्ती खेळाचा मोठा इतिहास आहे. अशा कुस्ती खेळासाठी राज्यातील सर्वात प्रतिष्ठित महाराष्ट्र केसरी यास्पर्धेला उद्यापासून सुरुवात होणार आहे.

यंदा पुण्याच्या कोथरूडमधील कुस्तीमहर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत या स्पर्धेचा थरार रंगणार असून ९०० पेक्षा अधिक पैलवानांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. पुण्याचे माजी महापौर आणि भाजप नेते मुरलीधर मोहोळ या वर्षाचे महाराष्ट्र केसरीचे आयोजक आहेत. १० जानेवारी पासून या स्पर्धेला प्रारंभ होणार असून १४ जानेवारी रोजी महाराष्ट्र केसरी किताबासाठी अंतिम लढा होईल. यंदाच्या स्पर्धेमध्ये राज्यातील ४५ तालीम संघातील विविध १८ वजनी गटात सुमारे ९०० पेक्षा अधिक पैलवान स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

कोथरूड येथील भव्य अशा ३२ एकर जागेत ही क्रीडानगरी साकारली असून, त्यात १२ एकरमध्ये ८० हजार आसनक्षमतेचे मैदान, दोन माती आणि तीन गादीचे आखाडे तयार करण्यात आले आहेत. यंदा महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्यांवर बक्षिसांची उधळण होणार असून यात रोख रक्कम आणि मानाच्या गदे सह महिंद्राची थार गाडी, ट्रॅक्टर आणि जावाच्या १८ टू-व्हीलर देण्यात येणार आहेत. अनेक नामांकित कुस्तीपटू या स्पर्धेत सहभागी होणार असून यामध्ये गतविजेता पृथ्वीराज पाटील, बाला रफीक शेख, सिकंदर शेख, अभिजीत कटके, किरण भगत यांच्यासह अनेक नवीन पैलवानांचा समावेश आहे. यंदा महाराष्ट्र केसरीच्या विजेत्याला रोख ५ लाखांचे बक्षीस, महिंद्रा थार गाडी तसेच उपविजेत्याला ट्रॅक्टर आणि अडीच लाखांचे रोख बक्षीस मिळणार आहे. 

१८ वजन गटातील विजेत्यांना १८ जावा कंपनीच्या गाड्या देण्यात येणार आहेत. त्यासोबतच कुस्तीपटूंची राहण्याची, जेवणाची व्यवस्था आणि क्वालिटी किटही देण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र केसरीचे प्रमुख संयोजक मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. यंदा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावण्यासाठी राज्याच्या विविध भागातून आलेल्या पैलवानांचा कस लागणार असून यावर्षी स्पर्धेत कोण बाजी मारणार हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.





  Print






News - Rajy




Related Photos