केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवरून हात झटकले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
पेट्रोल-डिझेलचे दर 'शंभरी'कडे झुकले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने यात वाढ होताना दिसत असून यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कोरोना महामारीमुळे आधीच आर्थिक तंगीत आलेल्या सर्वसामान्यांच्या खिशावर यामुळे मोठा ताण पडत आहे. अशातच केंद्र सरकारने मात्र पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवरून हात झटकले आहेत.
राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या काळात विरोधी पक्षाने पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींचा मुद्दा उपस्थित केला. याला उत्तर देताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधआन यांनी यावर केंद्र सरकार काही करू शकत नाही, असे म्हणत हात वर केले. पेट्रोल-डिझेलच्या किंमती पेट्रोलियम कंपन्या ठरवतात. तसेच हे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असल्याचेही ते म्हणाले.
पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होण्यासाठी केंद्र सरकारने यावर लावलेले कर कमी करावेत अशी मागणी विरोधी पक्षाकडून होत आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार शांतनू सेन यांनी ही मागणी केली. यावर उत्तर देताना पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, तेलाची किंमत फक्त केंद्र सरकारच्या करांवरून ठरत नाहीत. या किंमती राज्य सरकारांनी लावलेले कर आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमती यावरही अवलंबून असतात. तसेच विकासासाठी केंद्रासह राज्य सरकारही पेट्रोल-डिझेलवरील करांमध्ये वाढ किंवा घट करत असतात, असेही ते म्हणाले.
पेट्रोलियम मंत्री म्हणाले की, पेट्रोलियम पदार्थांवर प्रत्येक आतापर्यंत प्रत्येक सरकारने कर लावलेले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी जास्त होतात, त्या प्रमाणे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत चढ-उतार होत असतात. तसेच सरकारी तेल कंपन्यांना तेलाच्या किंमती निश्चित करण्याचे स्वातंत्र देण्यात आले असल्याचेही ते म्हणाले.
केंद्र आणि राज्य सरकार नागरिकांच्या जनकल्याण योजनांसाठी पेट्रोल-डिझेलवर कर लावतात. याआधी देशात आलेल्या प्रत्येक सरकारने असे केलेले आहे. पेट्रोल-डिझेलवर केंद्र सरकार एक्साईज ड्यूटी लावते, तर राज्य सरकारही यावर व्हॅट वसूल करतात, असेही धर्मेंद्र प्रधान संसदेत म्हणाले. तसेच गेल्या 300 दिवसांपैकी 60 दिवसात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. 21 दिवसात पेट्रोल आणि 7 दिवसात डिझेलच्या किंमतीतही घट झाली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच विरोधक ज्या देशांची तुलना करत आहेत, त्या देशांमध्ये केरोसिन (रॉकेल)ची किंमत 57 रुपये प्रति लिटर असून हिंदुस्थानमध्ये 32 रुपये प्रति लिटर आहे, असेही त्यांनी सांगितले.
  Print


News - World | Posted : 2021-02-10


Related Photos