वाघाच्या हल्ल्यात धुंडेशिवनी येथील इसम ठार : पिपरटोला जंगल परिसरातील घटना


- पिपरटोला जंगल परिसरातील घटना 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अमिर्झा :
आज दि. ३१ जानेवारी ला सकाळी १० ते ११ वाजताच्या दरम्यान पिपरटोला नजीक जंगल परिसरात वाघाने दयाराम चूधरी यांच्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडलेली आहे. वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले व्यक्ती हे धुंडेशिवणी येथील रहिवासी असून त्यांचे अंदाजे वय ६५ वर्ष सांगितले जात आहे. दयाराम चूधरी हे अन्य दोन व्यक्तीसोबत सरपण जमा करण्याकरीता पोरला वन विभाग परीक्षेत्रातील पिपरटोला नजीक जंगलात गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला वाघाने बैलावर झडप घालण्याचा प्रयत्न केला असता तिघांकडून बैलांना वाचविण्यात यश आले. परंतु ३ व्यक्तीच्या गटातील १ व्यक्तीवर म्हणजेच दयाराम चूधरी यांच्यावर वाघाने हल्ला चढवून लांबवर ओढत नेऊन ठार केल्याची घटना घडलेली आहे. सदर वृत्त लिहेपर्यंत घटनेचा पंचनामा करण्यात येत आहे. घटना घडलेल्या भागात आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात वाघाची प्रचंड मोठ्या प्रमाणात दहशत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर वाघाला बंदिस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 

सदर परिसरात ही दुसरी घटना असून या अगोदर कळमटोला येथील एका महिलेवर हल्ला करीत तिला जखमी केले होते. या परिसरात वारंवार रस्त्यावर वाघ बघावयास मिळत असून या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे वाघांचा बंदोबस्त करण्याची जनतेकडून मागणी केली जात असून वन विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-01-31


Related Photos