कॅन्सरपेक्षा जातीयतेच्या विषाची जास्त भीती : पायल तडवीच्या मातोश्री आबेदा यांची भावना


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
वृत्तसंस्था / पुणे :
स्वत:ला झालेल्या कॅन्सरची जेवढी भीती वाटत नाही तेवढी जातीयतेच्या विषाची वाटते; जे की आपल्या मुलांना दिले जात आहे, अशी खंत वैद्यकीय शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेताना आत्महत्या केलेल्या पायल तडवी हिच्या मातोश्री आबेदा यांनी शनिवारी व्यक्‍त केली.
भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियानांतर्गत आयोजित 'एल्गार परिषद 2021'ला त्या उपस्थित होत्या. यावेळी एस. एम. मुश्रीफ, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, बंत सिंग, आयेशा रेन्ना आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला 'महार मांगांच्या दु:खाविषयी..' या 1855 मध्ये मुक्‍ता साळवे या तरुणीने लिहिलेल्या निबंधाचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
साळवे या मातंग समाजाच्या मुलीने तत्कालीन जातिभेद आणि समाजव्यवस्थेविषयी लिहिलेल्या या निबंधाच्या माध्यमातून उपस्थित केलेले प्रश्‍न अजूनही अनुत्तरितच आहेत, असे मत उपस्थितांनी व्यक्‍त केले.
वैद्यकीय क्षेत्रातील 'एमडी' पदवी घेतल्यानंतर पायल उंच भरारी घेऊन उडणार होती. मात्र, ती जातीयव्यवस्थेची बळी ठरली. ती गेल्यावर आम्ही मनाने कधीच मेलो आहोत. तिच्यावर जी परिस्थिती ओढवली होती ती कोणाही बाबतीत होऊ नये यासाठी आम्ही या संघर्षात उडी घेतली आहे, असे आबेदा यांनी सांगितले.
  Print


News - Rajy | Posted : 2021-01-31


Related Photos