आता २१ प्रकारच्या दिव्यांगांना मिळणार दिव्यांगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र


- नव्याने १५ आजारांचा समावेश 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
केंद्र शासनाच्या ‘दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६’ची अंमलबजावणी राज्यात सुरू केली आहे. त्यानुसार अधिनियमात नव्याने समाविष्ट केलेल्या १५ प्रकारातील दिव्यांगांनाही दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यामुळे आता २१ प्रकारच्या दिव्यांगांना दिव्यांगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यासाठीची तपासणी प्रत्येक जिल्ह्यातील संबंधित रुग्णालयातून करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत.
आतापर्यंत राज्यात केवळ सहा प्रकारच्या दिव्यांगांना दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात येत होते.  दृष्टिदोष, कर्णबधिरता, शारीरिक दिव्यांगता, मानसिक आजार, बौद्धिक दिव्यांगता, बहुदिव्यांगता यासारख्या दिव्यांगांना आतापर्यंत सरकारी हॉस्पिटलमध्ये प्रमाणपत्र दिले जात होते. दिव्यांगाच्या कक्षेत वाढ करण्यात येऊन त्यामध्ये आणखी १५ आजारांचा नव्याने समावेश करण्यात आल्याने आता २१ दिव्यांगांना वैद्यकीय प्रमाणपत्रे मिळणार आहेत. नव्याने समाविष्ट केलेल्या  आजारांमध्ये थॅलेसेमिया, हिमोफेलिया, स्वमग्नता, सेरेब्रल पाल्सी, पार्किसन्स यासारख्या महत्त्वाच्या आजारांचा समावेश झाल्याने त्या व्यक्तींना लाभ मिळू शकेल.
 हे प्रमाणपत्र राज्यातील जिल्हा, सामान्य, उपजिल्हा हॉस्पिटल, सरकारी, महापालिकेची वैद्यकीय महाविद्यालये, केंद्र सरकारच्या ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन ॲन्ड रिहॅबिलिटेशन’ हाजी अली, मुंबई आणि ‘अलियावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच ॲन्ड हिअरिंग डिसॲबिलिटिज’ या संस्थांमार्फत देण्यात येते. दरम्यान, केंद्र सरकारने नुकताच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ हा कायदा मंजूर केला. 
दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी संबंधित दिव्यांग व्यक्ती ही ज्या जिल्ह्याची रहिवासी आहे, त्याच जिल्ह्यातील संस्थेमार्फत मूल्यमापन  तसेच तपासणी करून देण्यात येईल. संबंधित दिव्यांगाचे तज्ज्ञ त्या जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये नसल्यास जवळच्या सरकारी जिल्हा हॉस्पिटल, सरकारी, महापालिका मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमधून प्रमाणपत्र मिळू शकेल. त्यासाठी www.swavlambanoard.gov.in या वेबसाइटवरून अर्ज करता येईल.
केंद्र शासनाच्या अधिनियमानुसार दृष्टिदोष (अंधत्व), कर्णबधिरता, शारीरिक दिव्यांगता, मानसिक आजार, बौद्धिक दिव्यांगता, बहुदिव्यांगता, याशिवाय नव्याने समाविष्ट केलेल्या दिव्यांगतेमध्ये शारीरिक वाढ खुंटणे (डॉर्फिझम), स्वमग्नता (ऑटिझम), मेंदूचा पक्षाघात (सेरेब्रल पाल्सी), स्नायूंची विकृती (मस्क्‍युलर डिस्ट्राफी), मज्जासंस्थेचे जुने आजार (क्रॉनिक न्यूरॉलॉजिकल कंडिशन), अध्ययन अक्षमता, मल्टीपल स्क्‍लेरॉसिस, वाचा व भाषा दोष, थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकलसेल डिसीज, ॲसिड हल्ला पीडित, पार्किसन्स डिसीज, दृष्टिक्षिणता, कुष्ठरोग यासारख्या आजाराच्या पेशंटना दिव्यांगतेच्या प्रमाणपत्राचा लाभ मिळणे शक्‍य होणार आहे.

आवश्‍यक कागदपत्रे

 अर्जदार किंवा तो सक्षम नसल्यास कायदेशीर पालकांना ऑनलाईन अर्ज करता येईल.
 ओळखीचा पुरावा, निवासी पुरावा, दोन पासपोर्ट फोटो आवश्‍यक.
 एसएडीएम प्रणालीद्वारे दिलेले दिव्यांग प्रमाणपत्रही वैध राहणार आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2018-10-18


Related Photos