राहत्या घरातून एक लाखांची दारू जप्त : पावी मुरांडा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने पावी मुरांडा येथे मोठी कारवाई केली. या कारवाईत श्रीकृष्ण पत्रू चापडे यांच्या राहत्या घरातून तब्बल १ लाख ५ हजार ३६० रुपयांचा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पंचांसमक्ष छापा टाकला. झडतीदरम्यान घरामध्ये मोठ्या प्रमाणात दारूचा साठा आढळून आला.
तपासात ४ खाकी खरड्याच्या खोक्यांत १८० मिली मापाच्या रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्कीच्या १९२ सिलबंद बाटल्या, ३ खोक्यांत हावर्ड स्ट्राँग बिअरचे ७२ टिन कॅन तसेच १२ खोक्यांत रॉकेट देशी दारूच्या १२०० सिलबंद बाटल्या असा एकूण १ लाख ०५ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल आढळला. संबंधित सर्व दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी श्रीकृष्ण चापडे यांच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. ही कारवाई प्र. निरीक्षक शु. ले. चौधरी, दुय्यम निरीक्षक चं. वि. भगत तसेच कर्मचारी वि. पु. शेंदरे व रा. सुरजुसे यांनी केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक चं. वि. भगत करीत आहेत.
News - Gadchiroli




Petrol Price




