चंद्रपूर नंतर मेळघाटात मृतावस्थेत आढळला वाघ : शवविच्छेदनानंतर होणार मृत्यूचे कारण स्पष्ट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील रायपूर वनपरिक्षेत्रात एक वाघ मृतावस्थेत आढळून आला आहे. रायपूर वनपरीक्षेत्रातील वनकर्मचारी फायर लाईनचे काम असताना माडीझडप गावाजवळ 3 किलोमीटर अंतरावर एक वाघ मृतावस्थेत आढळला आहे. या वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वनकर्मचाऱ्यांनी तात्काळ संबंधित वनअधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत मृत वाघाचा पंचनामा केला. वाघाच्या पंजाची 18 नखे, 4 दात, मिशा,कातडी शाबूत आहेत. तसेच मृत वाघाच्या शरीरवर कोणत्याही जखमा नाहीत. त्यामुळे वाघाची शिकार झाल्याचे प्राथमिक दृष्ट्या स्पष्ट होत नाही. हा वाघ 6 ते 7 वर्षाचा असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मृत वाघाचे मृत्यूचे कारण शोधण्यासाठी त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतर मृत वाघाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
News - Rajy | Posted : 2021-01-22