स्वतंत्र विदर्भ राज्याचा विषय ‘रालोआच्या’ च्या पुढील बैठकीत मांडणार : रामदास आठवले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर
: स्वतंत्र विदर्भ राज्य करा आणि ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवून ७५ टक्के करा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर पुढच्या ‘रालोआच्या’च्या बैठकीत करणार, अशी माहिती केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी  बुधवारी रविभवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमीच लहान राज्यांची संकल्पना मांडली. लहान राज्यात गोर-गरिबांना लवकर न्याय मिळू शकतो, अशी त्यांची भावना होती. भाजपनेही लहान राज्याला समर्थन देत स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव केला होता. सत्तेत असताना भाजपनेच उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड ही तीन लहान राज्य दिली  होती.  आता स्वतंत्र विदर्भ राज्यही द्यावे, अशी आमची मागणी आहे. यंदा हे शक्य नाही. परंतु २०१९ मध्ये पुन्हा निवडून आल्यावर ही मागणी पूर्ण केली जाईल.
सध्या महाराष्ट्रात धनगर आणि मराठा, गुजरातमध्ये पाटीदार, राजस्थानमध्ये जाट, उत्तर प्रदेशमध्ये ठाकूर आणि ब्राह्मणसह इतरही समाजाकडून आरक्षणाची मागणी केली जात आहे. रिपब्लिकन पक्षाने नेहमीच सध्याच्या आरक्षणाला हात न लावता इतरही मागास व आर्थिकदृष्टय़ा मागास समाजाच्या आरक्षणाला समर्थन दिले आहे, परंतु सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ५० टक्केच्या मर्यादेमुळे आरक्षणाबाबत अडचण येत आहे.  संसद ही सर्वोच्च असून कायदा पारीत करून हे आरक्षण २५ टक्के वाढवून ७५ टक्के करता येऊ शकते. पेट्रोल, डिझेलचा समावेश जीएसटीमध्ये करावा. जेणेकरून त्यांचे दर सुमारे २० ते ३० रुपयांनी कमी होतील, अशी मागणीही आठवले यांनी केली.   Print


News - Nagpur | Posted : 2018-10-18


Related Photos