महत्वाच्या बातम्या

 आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाला भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज भामरागड तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात असलेल्या लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा येथे भेट देऊन पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी लोकबिरादरी प्रकल्पातील विविध आरोग्य व सामाजिक उपक्रमांची सविस्तर पाहणी केली.

या भेटीदरम्यान आरोग्यमंत्री आबिटकर यांनी प्रकल्पांतर्गत चालणाऱ्या रुग्णालय, निवासी आश्रमशाळा तसेच आदिवासी समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी लोकबिरादरी प्रकल्पाने केलेले योगदान अत्यंत प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी मंत्री आबिटकर यांनी डॉ. आमटे यांना उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर झाल्यानंतर इतक्या दुर्गम आदिवासी भागात सेवा देण्याची प्रेरणा कशी मिळाली, अशी विचारणा केली. त्यावर उत्तर देताना डॉ. आमटे यांनी सांगितले की, गेल्या ५२ वर्षांपासून लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून गोरगरीब आदिवासी समुदायासाठी आरोग्य, शिक्षण व मानवतावादी सेवा दिली जात आहे.

विशेष म्हणजे प्रकल्पाच्या सुरुवातीच्या २२ वर्षांपर्यंत या भागात वीज सुविधा उपलब्ध नव्हती, तरीही प्रतिकूल परिस्थितीतही सेवा अखंडपणे सुरू ठेवण्यात आली, असे त्यांनी सांगितले.

लोकबिरादरी प्रकल्पामध्ये शासनाच्या विविध आरोग्य योजना प्रभावीपणे राबविल्या जातात का, तसेच शासनाकडून आणखी कोणत्या प्रकारची मदत अपेक्षित आहे, याबाबत मंत्री महोदयांनी चर्चा केली. यावेळी डॉ. आमटे यांनी भामरागड परिसरात सर्पदंशाच्या घटना वारंवार घडत असल्याने सर्पदंशावरील औषधोपचारासाठी विशेष सवलत व सुविधा मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या भेटीत डॉ. आमटे यांच्या पत्नी मंदाकिनी आमटे तसेच लोकबिरादरी प्रकल्पातील सदस्यांशी संवाद साधत स्थानिक आरोग्य सेवेच्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. दुर्गम भागातील रुग्णवाहिका सेवा, औषधसाठा, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल विचारविनिमय झाला.

आरोग्यमंत्री आबिटकर यांनी स्थानिक नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेत निवेदने स्वीकारली व त्यावर योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिले. यानंतर मंत्री महोदयांनी भामरागड ग्रामीण रुग्णालय तसेच अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे भेट देऊन तेथील आरोग्य सुविधा, रुग्णसेवा, मनुष्यबळ व औषधसाठ्याचा आढावा घेतला. आदिवासी व दुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos