महत्वाच्या बातम्या

 स्वच्छ गडचिरोलीसाठी ल्लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडकडून स्वयंचलित रस्ते स्वच्छता वाहन प्रदान


विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : शाश्वत विकास व गडचिरोली शहराच्या सर्वांगीण परिवर्तनाबाबत आपली दृढ बांधिलकी अधोरेखित करत ल्लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांतर्गत गडचिरोली नगर परिषदेस अत्याधुनिक स्वयंचलित रस्ते स्वच्छता वाहन प्रदान केले आहे.

नवीन समाविष्ट करण्यात आलेले हे स्वयंचलित स्वच्छता वाहन शहरातील प्रमुख रस्त्यांवरील स्वच्छता कार्य अधिक कार्यक्षम, जलद व प्रभावी करण्यास महत्त्वपूर्ण ठरणार असून धूळ प्रदूषणातही लक्षणीय घट होण्यास मदत करेल.

विशेष म्हणजे, या वाहनाच्या संचालन व देखभालीची जबाबदारी ल्लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडकडून नगर परिषदेसोबत समन्वय साधून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात येणार आहे.

हा उपक्रम जिल्हा प्रशासनासोबतच्या सातत्यपूर्ण सहकार्याचा आणखी एक मैलाचा दगड ठरत असून स्वच्छ, निरोगी व शाश्वत गडचिरोली घडविण्याच्या कंपनीच्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे.

या अत्याधुनिक यंत्राचे उद्घाटन गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नारोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगर परिषदेचे प्रमुख अधिकारी व कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. पर्यावरण संवर्धन, नागरी पायाभूत सुविधा सुधारणा व सार्वजनिक आरोग्य उन्नतीसाठी कंपनीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे द्योतक आहे.

कार्यक्रमास माजी खासदार अशोक नेते, गडचिरोली नगर परिषदेचे उपाध्यक्ष निखिल चारडे, आरोग्य व स्वच्छता समितीचे सभापती मुक्‍तेश्वर कटवे तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

ल्लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड, गडचिरोलीचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. आपल्या मनोगतात त्यांनी कंपनीद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध CSR उपक्रमांची माहिती देत पायाभूत सुविधा विकास, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि समुदाय विकासासाठी कंपनीची वचनबद्धता अधोरेखित केली.

तसेच ल्लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक  बी. प्रभाकरन यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे जिल्ह्यात परिवर्तनात्मक विकास उपक्रमांना गती मिळत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करत प्रदूषणमुक्त व स्वच्छ शहर घडविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos