कामठीतील मेहाडिया इंटरप्रायझेस कंपनीला भीषण आग, ५ कोटी रुपयांचे नुकसान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : कामठी जवळील उप्पवाडी येथील मेहाडिया इंटरप्रायझेस प्रा.लि. या पेपर प्रोसेसिंग कंपनीला मंगळवारी मध्यरात्री दीड वाजता भीषण आग लागली. या आगीत कंपनीची संपूर्ण मशिनरी आणि कच्चा माल जळून खाक झाला असून, सुमारे ५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मधुसुधन उदयप्रकाश मेहाडिया यांच्या मालकीच्या या कंपनीत अचानक आग लागली. कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर पेपर साठा आणि केमिकल्स असल्यामुळे आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. आगीच्या ज्वाळा इतक्या भयानक होत्या की त्या दूरूनच स्पष्ट दिसत होत्या.
घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन विभागाने तातडीने ७ तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. सिव्हिल लाईन, कळमना, सुगतनगर, त्रिमुर्तीनगर आणि लकडगंज येथील बंबांसह वाठोडा फायर स्टेशनचे २ बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. मंगळवारी दुपारपर्यंत कूलिंगचे काम सुरू होते.
या आगीत कंपनीतील पेपर रोल, मशिनरी, लिफ्ट फोक, एलपीजी सिलिंडर, केमिकल ड्रम्स, फेव्हिकॉल ड्रम्स, एअर कंडिशनर्स आणि सिलिंग फॅन्ससह इतर साहित्य जळून खाक झाले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
News - Nagpur




Petrol Price




