महत्वाच्या बातम्या

 अविष्कार २०२५ राज्यस्तरीय संशोधन संमेलनात नागपूर विद्यापीठाची दैदिप्यमान कामगिरी : ७ पुरस्कारांची कमाई


- परभणी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत विविध प्रवर्गांत विद्यापीठाचा ठसा

-  संशोधन व नवोन्मेषातील उत्कृष्टतेचा गौरव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ संशोधन संमेलन अविष्कार २०२५ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत एकूण सात पारितोषिके पटकावली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (VNMKV), परभणी येथे २८ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत ही प्रतिष्ठित स्पर्धा पार पडली.

संशोधनातील गुणवत्ता, नवोन्मेष व शैक्षणिक उत्कृष्टतेचे दर्शन घडवत नागपूर विद्यापीठाने चार वेगवेगळ्या प्रवर्गांत प्रोत्साहनपर पारितोषिके, फेलोशिप तसेच रोख बक्षिसे मिळवली. राज्यस्तरावर मिळालेले हे यश विद्यापीठासाठी अत्यंत गौरवास्पद ठरले आहे.

वाणिज्य, व्यवस्थापन व विधी प्रवर्गातून पदव्युत्तर (PG) स्तरावर अश्विनी पाटील, पीएच.डी. (PPG) स्तरावर आकाश जैन; शुद्ध विज्ञान प्रवर्गातून पीएच.डी. (PPG) स्तरावर रोहित मदनकर; अभियांत्रिकी व तंत्रज्ञान प्रवर्गात पदव्युत्तर (PG) स्तरावर गायत्री बरडे, तर पीएच.डी. (PPG) स्तरावर प्रथम प्रोत्साहनपर पारितोषिक राधिका देशपांडे यांनी पटकाविले.

फेलोशिप व प्रमुख पारितोषिकांमध्ये शुद्ध विज्ञान प्रवर्गातून पदव्युत्तर (PG) स्तरावर द्वितीय पारितोषिक शताब्दी रॉय हिला (चषक, प्रमाणपत्र व ३५ हजार रुपये रोख पारितोषिक) मिळाले. तसेच वैद्यकीय व फार्मसी प्रवर्गातून पीएच.डी. (PPG) स्तरावर कु. मानसी तडस हिला (चषक, प्रमाणपत्र व १ लाख रुपये रोख फेलोशिप) प्रदान करण्यात आली. एकूणच चार प्रवर्गांत सात पारितोषिके पटकावत विद्यापीठाने संशोधन क्षेत्रातील सातत्यपूर्ण उत्कृष्टता अधोरेखित केली.

विद्यापीठस्तरीय अविष्कार स्पर्धा दोन टप्प्यांत घेण्यात आल्या. पहिल्या टप्प्यात (गोंदिया व भंडारा जिल्हे) ९१, तर दुसऱ्या टप्प्यात (नागपूर व वर्धा जिल्हे) ४९२ अशा एकूण ५८३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामधून सहा प्रवर्ग व तीन स्तरांतील ४८ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती.

राज्यस्तरीय स्पर्धेत नागपूर विद्यापीठाच्या ४८ विद्यार्थ्यांच्या चमूने इन्क्युबेशन सेंटरचे संचालक तथा संघ व्यवस्थापक डॉ. अभय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहभाग घेतला. यांना मथुरादास मोहोता विज्ञान महाविद्यालयातील प्रा. पायल दुधे तसेच विद्यार्थी विकास विभागाचे अरविंद कोठे यांचे सहकार्य लाभले.

या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील २६ विद्यापीठांतील ९०१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी ३०७ संघ व्यवस्थापक, विद्यार्थी विकास विभाग संचालक (DSD), नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ संचालक (IIL) तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर विद्यापीठाच्या अविष्कार कार्यकारी समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यशामागे विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. विजय खंडाळ यांचे मार्गदर्शन, अविष्कार कक्ष अध्यक्ष डॉ. निर्भय संचेती, राज्यपाल नामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समयजी बनसोड यांचे सहकार्य तसेच माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व मोलाचे ठरले.

माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर व कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी पुरस्कारप्राप्त सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. 





  Print






News - Nagpur




Related Photos